जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या दिवशी भारतीयांनी धडाकेबाज सुरुवात केली आहे. पुरुषांच्या एकेरी सामन्यात किदम्बी श्रीकांतने चीनच्या टियान होवुईचा २१-१५, १२-२१, २१-११ अशा सेट्समध्ये पराभव केला.

पहिल्या सेटच्या सुरुवातीला श्रीकांतने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्यात २ गुणांची नाममात्र आघाडी घेतली होती. काही वेळानंतर श्रीकांतने आक्रमक खेळ करत पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत आपली आघाडी ११-५ अशी आणखी भक्कम केली. यानंतर हुवाईने पहिल्या सेटमध्ये परतण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र किदम्बी श्रीकांतने त्याचे हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. अखेर पहिला सेट श्रीकांतने २१-१५ अशा फरकाने आपल्या खिशात घातला.

दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाही सामन्यात ३-३ अशी आघाडी होती. मात्र त्यानंतर चिनी प्रतिस्पर्ध्याने सामन्यात आघाडी घेत श्रीकांतला धक्का दिला. ६-३ अशा फरकाने पिछाडीवर पडल्यानंतर श्रीकांतने सामन्यात पुनरागमन करत पुन्हा ६-६ अशी बरोबरी साधली. मात्र हुवाईने परत सामन्यात आघाडी घेत श्रीकांतला बॅकफूटवर ढकललं. यानंतर हुवाईने श्रीकांतला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी न देता दुसरा सेट १२-२१ अशा फरकाने जिंकत सामन्यात बरोबरी साधली.

सामना जिंकण्याच्या दृष्टीकोनातून तिसरा सेट महत्वाचा असल्यामुळे श्रीकांतने तिसऱ्या सेटच्या सुरुवातीपासून हुवाईवर आक्रमण करत आघाडी घ्यायला सुरुवात केली. तिसऱ्या सेटमध्ये श्रीकांतकडे ६-१ अशी भक्कम आघाडी होती, हुवाईने परत श्रीकांतला टक्कर देत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र मध्यांतरापर्यंत श्रीकांतकडे सामन्यात ११-६ अशी आघाडी होती. यानंतर पहिल्या सेटप्रमाणे श्रीकांतने आक्रमक खेळ करत ११ मॅच पॉईंट वाचवत सामना आपल्या नावे केला.

दुसरीकडे सायना नेहवालने पहिल्या फेरीत सहज विजय प्राप्त केला. जागतिक क्रमवारीत २५ व्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या पी.चोचुवोंगचा २१-१७, २१-९ अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये थायलंडच्या चोचुवोंगने आघाडी घेत चांगली सुरुवात केली. मात्र सायना नेहवालने सेटमध्ये त्वरित पुनरागमन करत आघाडी घेतली. मात्र सायनाची ही आघाडी मोडून काढत चोचुवोंगने पहिल्या सेटमध्ये ११-९ अशी आघाडी घेतली. मात्र मध्यांतरानंतर सायनाने पुनरागमन करत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर अखेरच्या काही मिनीटांमध्ये आघाडी घेत सायनाने पहिला सेट आपल्या खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्ये सायना नेहवालने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला सामन्यात डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. प्रत्येक वेळी चोचुवोंगने दिलेली कडवी झुंज मोडून काढत सायनाने दुसरा सेट २१-९ अशा मोठ्या फरकाने जिंकत सामन्यात विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत सायनाचा सामना रिओ ऑलिम्पीक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरीनशी होण्याची शक्यता आहे.