तिच्यासह सायना व श्रीकांत यांच्यावर भारताची भिस्त

कोरियन विजेती पी. व्ही. सिंधूकडे जपान ओपन बॅडिमटन स्पर्धेत संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात आहे. तिच्याबरोबरच किदम्बी श्रीकांत व सायना नेहवाल हे भारताचे अव्वल दर्जाचे खेळाडूही या स्पध्रेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील पात्रता फेरीला मंगळवारी सुरुवात होत आहे.

सिंधूने कोरिया खुल्या सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत जग्गजेत्या नोझोमी ओकुहारावर मात केली होती. साहजिकच येथेही तिने अजिंक्यपद मिळवावे अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे. येथे तिला पहिल्या फेरीत जपानच्या मिनात्सु मितानीशी खेळावे लागणार आहे. कोरियन स्पर्धेत सिंधूने तिला हरवले होते.

जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतला पहिल्या फेरीत चीनचा खेळाडू तियान होउवेईशी खेळावे लागणार आहे. श्रीकांतने इंडोनेशियन व ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजमध्ये अजिंक्यपद मिळविले होते. तसेच त्याने सिंगापूर ओपन स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले होते. ग्लासगो येथील जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या सायनाने कोरियन स्पर्धेत भाग घेतला नव्हता. तिला येथे थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगविरुद्ध खेळावे लागणार आहे. तिने मलेशियन मास्टर्स स्पर्धेतील अंतिम सामन्यात चोचुवोंगला हरवले होते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेता पारुपल्ली कश्यपपुढे पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या एमिल होल्स्टचे आव्हान आहे. एच. एस. प्रणोयची डेन्मार्कच्या अ‍ॅण्डर्स अन्तोन्सन याच्याशी गाठ पडणार आहे. बी. साईप्रणीत व समीर वर्मा यांना पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंशी झुंजावे लागणार आहे. सौरभ वर्माला पहिल्याच फेरीत माजी जगज्जेता खेळाडू लिन दानविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे. मिश्रदुहेरीत प्रणव चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांना थायलंडच्या देचापोल पुवरानाक्रोह व सापसिरी तेरातनाचल यांच्याशी खेळावे लागेल. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व सिक्की यांच्यापुढे कोरियाच्या चांग येई नो व ली सोहेई यांचे आव्हान आहे.

पात्रता फेरीत मनु अत्री व बी. सुमेध रेड्डी यांची मलेशियाच्या जियान येईली व झेन तिंग लिम यांच्याशी लढत होईल. सात्त्विकसाईराज रानकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना पहिल्या सामन्यात हिरोकात्सु हाशिमोतो व हिरोयुकी सेईकी यांच्याशी झुंज द्यावी लागणार आहे.