पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयशी; सात्त्विक साईराज रानकीरेड्डीची ‘दुहेरी’ आगेकूच

ऑलिम्पिकपटू पारुपल्ली कश्यपचे जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. मात्र भारताच्या सात्त्विक साईराज रानकीरेड्डीने पुरुष दुहेरीत चिराग शेट्टीच्या साथीने आणि मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पासह आगेकूच केली आहे.

कश्यपने पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात डेन्मार्कच्या एमिल होल्स्टवर २१-१५, २१-१४ असा सफाईदार विजय नोंदवला. मात्र नंतरच्या लढतीत त्याला जपानच्या युई इगाराशीकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना युईने २१-११, १८-२१, २१-१४ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये कश्यपने स्मॅशिंगच्या प्रभावी फटक्यांबरोबरच प्लेसिंगचा कल्पक खेळ केला. मात्र निर्णायक गेममध्ये त्याला अपेक्षेइतका प्रभाव दाखवता आला नाही.

सात्त्विक साईराज व चिराग यांनी पात्रता फेरीतील पहिल्या लढतीत जपानच्या हिरोकात्सू हाशियोतो व हिरोयुकी साईकी यांच्यावर १४-२१, २२-२०, २१-१८ अशी एक तासाच्या खेळानंतर मात केली. पहिला गेम गमावल्यानंतर त्यांनी स्मॅशिंगचे जोरकस फटके व कॉर्नरजवळ प्लेसिंग असा खेळ करीत विजयश्री मिळवली. पाठोपाठ त्यांनी दुसऱ्या सामन्यात केईचिरो मात्सुई व योशिनोरी ताकेयुची या स्थानिक खेळाडूंना २१-१८, २१-१२ असे ३३ मिनिटांत पराभूत केले.

सात्त्विक साईराजने अश्विनी पोनप्पाच्या साथीने मिश्र दुहेरीतही दोन सामने जिंकून मुख्य फेरीकडे वाटचाल केली. या जोडीने जपानच्या हिरोकी मिदोरीकावा व नात्सु साईतो यांचा २१-१३, २१-१५ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. पाठोपाठ त्यांनी जपानच्याच हिरोकी ओकोमुरा व नारू शिनोया यांच्यावर २१-१८, २१-९ अशी मात केली. याचप्रमाणे भारताच्या प्रणव चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांनी आव्हान राखले. त्यांनी तोमाया ताकाशिना व योशिनोरी ताकेमुची या जपानच्या जोडीवर २१-१९, १७-२१, २१-१५ अशी मात केली.

या स्पर्धेत कोरियन विजेती पी. व्ही. सिंधू, जागतिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीत तसेच सौरभ व समीर वर्मा हे बंधू यांच्यावर भारताची भिस्त आहे. हे सामने बुधवारी होणार आहेत.