संसारपूर.. पंजाबच्या जालंदर शहरातील एक लहानसे गाव.. अनेक ऑलिम्पिक हॉकीपटू या गावाने भारताला दिले.. परंतु गेली काही वष्रे हे गाव पडद्याआड गेले होते.. मात्र बेल्जियम येथे सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेत युवा खेळाडू जसजित सिंग कुलरच्या दमदार कामगिरीमुळे संसारपूर हे गाव पुन्हा चर्चेत आले आहे.
संसारपूर या लहानशा गावाने भारताला अनेक ऑलिम्पिक विजेते खेळाडू दिले. अशा या ऐतिहासिक गावात जन्मलेल्या जसजितला साहजिकच लहानपणापासून हॉकीची ओढ निर्माण झाली. मात्र वयाच्या १८ व्या वर्षांनंतर त्याने हॉकीचा गांभीर्याने विचार केला. जागतिक हॉकी लीगमध्ये मलेशियाविरुद्धच्या लढतीत जसजितने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. ३-२ अशा विजयात जसजितने दोन गोल केले होते.
‘‘या खेळाकडे मी उशिरा वळलो आणि महाविद्यालयात प्रवेश मिळेपर्यंत खेळाचा गांभीर्याने विचारही केला नव्हता. संसारपूरमध्ये जन्मल्याने हॉकीची आवड होतीच, परंतु घरात सर्व डॉक्टर असल्याने वैद्यकीय शिक्षणावर मी लक्ष केंद्रित केले होते. जालंदर खालसा महाविद्यालयात गेल्यानंतर मी हॉकीचा गांभीर्याने विचार केला,’’ असे जसजितने सांगितले.
हॉकीची उशिराने सुरुवात करूनही जसजितने पाच वर्षांहून कमी कालावधीत भारतीय संघात स्थान मिळावले. २०१४ च्या विश्वचषक स्पध्रेत बेल्जियमविरुद्ध त्याने पदार्पण केले. प्रशिक्षक पॉल व्हॅन अ‍ॅस यांच्या मार्गदर्शनाखाली जसजितला मोठी संधी मिळाली. अ‍ॅस यांनी त्याला ड्रॅग फ्लिकर म्हणून संघात घेतले आणि व्ही. आर. रघुनाथ आणि रुपिंदर पाल सिंग या प्रमुख पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याने आपली कामगिरी चोख बजावली.
१४ संसारपूर या गावाने आत्तापर्यंत १४ ऑलिम्पिकपटू घडवले आहेत. त्यातील नऊ जणांनी भारताचे, चौघांनी केनिया आणि एकाने कॅनडाचे प्रतिनिधित्व केले आहे.

१९६८ मेक्सिको ऑलिम्पिक स्पध्रेत या गावातील सात जणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी पाच भारताकडून, तर दोन केनियाकडून खेळले होते. या पाच खेळाडूंमध्ये अजितपाल सिंग, जगजित सिंग, बलबीर सिंग (सव्‍‌र्हिस), बलबीर सिंग (पंजाब) आणि तारसेन सिंग यांचा समावेश होता. तर हरदेव सिंग आणि जगजित सिंग यांनी केनियाचे प्रतिनिधित्व केले.