ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने बाजी मारली. इंदूरच्या मैदानावर रंगलेला तिसरा सामना जिंकत भारताने मालिका खिशात घातली. सलग तिसऱ्या पराभवानंतर स्मिथनं भारतीय गोलंदाजांच कौतुक केलं. सध्याच्या घडीला भुवनेश्वर कुमार आणि बुमराह डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता असणारे गोलंदाज असल्याचे त्यानं म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तिसऱ्या आणि महत्त्वपूर्ण सामन्यात अॅरॉन फिंचच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. मात्र अखेरच्या १० षटकांत कांगारुंना झटपट धावा करण्यात अपयश आले. भुवनेश्वर आणि बुमराहने अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला लगाम घातला. भूवी आणि बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक करताना स्मिथ म्हणाला की, मला वाटते भुवनेश्वर आणि बुमराह सध्याच्या घडीला डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करणारे गोलंदाज आहेत. आम्ही सुरुवात खूपच चांगली केली. मात्र अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. ३८ षटकांपर्यंत आम्ही चांगला खेळ केला. त्यानंतर ३३० धावांपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. आम्ही या धावसंख्येपर्यंत पोहोचलो असतो, तर सामन्याचा निकाल वेगळा असता. यावेळी स्मिथने शतकवीर फिंचचं देखील कौतुक केलं.

दोन सामन्यात संघाबाहेर असलेल्या फिंचने तिसऱ्या सामन्यात १२४ धावांची अफलातून खेळी केली होती. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वर कुमारला एकही बळी मिळवता आला नव्हता. मात्र, आपल्या कोट्यातील १० षटकांत त्यानं ५.२० च्या सरासरीनं ५२ धावा खर्च केल्या. दुसरीकडे जसप्रित बुमराहने तेवढ्याच धावा देत ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय फिरकीपटू कुलदीप यादवने दोन तर युजवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला होता. भारताने ५ गडी राखून हा सामना जिंकत मालिका खिशात घातली.