गेल्या काही दिवसांमध्ये जयपूर वाहतूक पोलिसांनी केलेली एक जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच गाजताना दिसत आहे. चॅम्पियन्स करंडकात अंतिम सामन्यात जसप्रीत बुमरहाने टाकलेल्या नो बॉलवर पाकिस्तानच्या सलामीवीराला जीवदान मिळालं होतं. याच नो बॉलचं पोस्टर करुन जयपूर वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आव्हान केलं होतं.

जयपूर पोलिसांनी केलेल्या जाहिरातीत बुमरहाचा नो बॉल टाकतानाचा फोटो आणि झेब्रा क्रॉसिंगवर काही गाड्या उभ्या असलेल्या दाखवल्या आहेत. याखाली; ”लक्ष्मणरेषा ओलांडू नका, महागात पडू शकते” अशा आशयाचा संदेश देण्यात आला आहे. मात्र बुमराहला जयपूर पोलिसांची ही जाहिरातबाजी फारशी काही रुचलेली नाही.

( छाया सौजन्य : जयपुर वाहतूक पोलीस/ ट्विटर )

” जयपूर पोलिस खूप छान, आपल्या देशासाठी खेळताना सर्व काही झोकून दिल्यानंतर आपल्याला कसा सन्मान मिळतो हे तुम्ही दाखवून दिलंत. मात्र काही काळजी करु नका. तुम्ही कामावर करत असलेल्या चुकांची मी अशी मस्करी कधीच करणार नाही, कारण मला माहिती आहे चुका या माणसांकडूनच होत असतात”, अशा आशयाचं ट्विट करुन बुमरहाने आपली नापसंती दर्शवली आहे.

चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर ३ धावांवर असताना बुमरहाच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देत माघारी परतला होता. मात्र तो बॉल बुमरहाने नेमका नो बॉल टाकल्यामुळे फखार झमानला जीवदान मिळालं होतं. याचा फायदा घेत फखार झमानने आपला साथीदार अझर अलीसोबत शतकी भागिदारी करत भारतीय गोलंदाजांचं कंबरडच मोडलं होतं. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. मात्र बुमराहला संघातून विश्रांती देण्यात आलेली आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ पुन्हा एकदा वन-डे सामने खेळणार आहे. त्यावेळी बुमराहकडे आपल्या टिकाकारांना उत्तर देण्याची नामी संधी असणार आहे.