किदम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का
अजय जयराम, एच. एस. प्रणॉय यांच्यासह बी. साईप्रणीत यांनी मकाऊ गां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र अव्वल मानांकित किदम्बी श्रीकांतला सलामीच्या लढतीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. साईप्रणीतने इंडोनेशियाच्या फिकरी इहसानंदी हाडामडीचा २१-१८, २३-२१ असा पराभव केला. सातव्या मानांकित प्रणॉयने इंडोनेशियाच्या सुकमाता इव्हर्टला २१-१५, १६-२१, २१-१८ असे नमवले. नवव्या मानांकित अजय जयरामने हाँगकाँगच्या ताम चुन हेईवर २१-६, २५-२३ अशी मात केली. इंडोनेशियाच्या ख्रिस्ती जोनाटनने अव्वल मानांकित श्रीकांतवर २१-१६, २३-२१ असा विजय मिळवला. यंदाच्या हंगामात श्रीकांतला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यामुळेच जागतिक क्रमवारीत त्याची घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या चीन खुल्या स्पर्धेतही श्रीकांतला झटपट माघारी परतावे लागले होते. सायना नेहवाल दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी झालेली नाही.