मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती झाल्यानंतर आता महिला क्रिकेटरच्या जीवनावर चित्रपट साकारण्यात येणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारित ‘चाकदह एक्स्प्रेस’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यापासून ते क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसपर्यंतचा झुलनचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. हिंदी भाषेतील या चित्रपटाचे दिग्दर्शन सुशांत दास करणार आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक बंगाली चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटाविषयी दास म्हणाले की, लवकरच या चित्रपटाची संहिता लिहिण्यास सुरुवात करणार असून झुलनच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देणाऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींशी यासंदर्भात चर्चा सुरु असून लवकरच अभिनेत्रीच्या नावाची घोषणा करु, असेही त्यांनी सांगितले. या चित्रपटामुळे युवापिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या जीवनपटामुळे महिला क्रिकेटरच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती करण्याची कल्पना सुचली. महिला क्रिकेटरच्या जीवनावर भाष्य करणारा हा पहिला चित्रपट असेल, असेही ते म्हणाले. झुलन ज्या ज्या मैदानात खेळली आहे, त्या सर्व मैदानात चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

झुलन भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. आयसीसी महिला विश्वचषकात आपल्या दमदार खेळीने तिनं सगळ्यांची मनं जिंकली. क्रिकेट हा श्वास मानणारी झुलन सध्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यावर अधिक भर देत आहे. भविष्यात नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा मानस तिने एका मुलाखतीमध्ये व्यक्त केला होता.