भारतीय वरिष्ठ हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांचे मत

भारताने कनिष्ठ गटात गेल्या १५ वर्षांमध्ये विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकलेली नाही. आता त्यांना हा दुष्काळ संपवण्याची हुकमी संधी चालून आली आहे. या संधीचा त्यांनी पुरेपूर लाभ घेतला पाहिजे, असे भारतीय  वरिष्ठ हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी येथे सांगितले.

ओल्टमन्स यांच्याकडे भारताच्या वरिष्ठ संघाची जबाबदारी आहे, तर हरेंद्र सिंग हे कनिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ओल्टमन्स म्हणाले, ‘‘भारताच्या वरिष्ठ संघात लवकरच काही बदल केले जाणार आहेत. लखनौ येथे ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कनिष्ठ गटाच्या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे कनिष्ठ संघातील खेळाडूंना वरिष्ठ संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊनच त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे. कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीचा फायदा त्यांना आगामी हॉकी इंडिया लीगसाठी होणार आहे.’’

‘‘कनिष्ठ संघातील खेळाडूंनी अपेक्षांचे ओझे मनावर ठेवू नये अन्यथा त्यांच्याकडून अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा खेळ होऊ शकणार नाही. भारताचा कनिष्ठ संघ अतिशय समतोल आहे. त्यांच्याकडे वेगवान खेळ करण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत तसेच भक्कम बचावफळीही आहे,’’ असे ओल्टमन्स यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘हॉकी इंडिया लीगमधील सामन्यांचा अनुभव या खेळाडूंकडे असल्यामुळे मला त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. खेळाच्या प्रत्येक आघाडीवर सर्वोच्च यश मिळवणारे खेळाडू या संघात आहेत. फक्त त्यांनी आपल्या क्षमतेइतकी कामगिरी केली पाहिजे. आमचे खेळाडू आक्रमक खेळावरच भर देतील अशी मला खात्री आहे.’’

भारतीय संघ विजेतेपद मिळवेल काय, असे विचारले असता ओल्टमन्स म्हणाले, ‘‘संघाकडे विजेतेपदाची क्षमता असली तरी प्रत्यक्षात अंदाज बांधणे कठीण आहे. कारण खेळात केव्हाही व कोणीही कलाटणी देणारी कामगिरी करू शकते. प्रत्येक भारतीयाला आपल्या संघाने सुवर्णपदक जिंकावे असे वाटते. मात्र अंदाज व्यक्त करीत त्यावर विसंबून राहणे मला आवडत नाही. सध्या आमचा पहिला सामना कॅनडाशी होणार असून त्या सामन्यावर मी लक्ष केंद्रित करीत आहे. कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत कोणीही आश्चर्यजनक कामगिरी करू शकते. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अर्जेटिना, नेदरलँड्स, इंग्लंड असे बलाढय़ संघ खेळत असल्यामुळे प्रत्येक संघाला विजेतेपदाची संधी आहे.’’

भारताला ‘ड’ गटात कॅनडा, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्याशी खेळावे लागणार आहे. भारताचा पहिला सामना गुरुवारी कॅनडाशी होईल. भारताने २००१मध्ये होबार्ट (ऑस्ट्रेलिया) येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.