जस्टीन गॅटलिनने २०० मीटर अंतराची शर्यत १९.५७ सेकंदांत पार करीत अमेरिकन मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. या कामगिरीद्वारा त्याने आगामी जागतिक स्पर्धेसाठी आपल्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
गॅटलिन म्हणाला, ‘‘माझ्या यापूर्वीच्या कामगिरीबाबत सातत्याने टीका होत होती. त्यांना आपल्या कामगिरीनेच उत्तर द्यावे, असा निर्धार मी व्यक्त केला होता. याआधी मी नुकतेच हे अंतर १९.६८ सेकंदांत पार केले होते.’’
उत्तेजक सेवनाबद्दल गॅटलिन याच्यावर चार वर्षांकरिता बंदी घातली होती. त्याची मुदत संपल्यामुळे तो पुन्हा शर्यतीत उतरला होता. युसेन बोल्टने हे अंतर १९.१९ सेकंदांत पार करीत विश्वविक्रम नोंदवला आहे. त्याच्याखालोखाल योहान ब्लेक, मायकेल जॉन्सन, वॉल्टर डिक्स व गॅटलिन हे खेळाडू आहेत.
जागतिक मैदानी स्पर्धा २२ ते ३० ऑगस्टदरम्यान बीजिंग येथे होणार आहे. या स्पर्धेत गॅटलिन हा १०० मीटर व २०० मीटर अंतराच्या शर्यतीत भाग घेणार आहे. त्याच्यापुढे मुख्यत्वे बोल्टचेच आव्हान असणार आहे.
गॅटलिनचा सहकारी इसेह यंग (१९.९३ सेकंद) व वॉलेस स्पीअरमोन (२०.१० सेकंद) यांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने शर्यत पार केली. गॅटलिनचा सहकारी टायसन गे याने शंभर मीटर शर्यतीचे विजेतेपद मिळवत जागतिक स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे.
महिलांमध्ये २०० मीटर शर्यतीत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी अ‍ॅलिसन फेलिक्सला जागतिक स्पर्धेत विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान मिळणार असल्यामुळे तिने येथे भाग घेतला नाही. तिच्या अनुपस्थितीत जेना प्रिदनीने २०० मीटर शर्यत जिंकली. तिने हे अंतर २२.२० सेकंदांत पार केले. कँडिसी मॅकग्रोनीने २२.३८ सेकंद वेळ नोंदवत दुसरा क्रमांक मिळवला, तर जेनेबा तार्मोहला (२२.४४ सेकंद) तिसरे स्थान मिळाले.
विश्वविजेता खेळाडू डेव्हिड ऑलिव्हरने अपेक्षेप्रमाणे ११० मीटर अडथळा शर्यतीचे विजेतेपद पटकावले. हे अंतर पार करण्यास त्याला १३.०४ सेकंद वेळ लागला. रोनी अ‍ॅश (१३.१३ सेकंद) व एरिस मेरीट (१३.१९ सेकंद) यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. ऑलिव्हरला जागतिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार असल्यामुळे चौथा क्रमांक मिळवणारा अ‍ॅलेक हॅरीसलाही (१३.२५ सेकंद) जागतिक स्पर्धेत संधी मिळणार आहे.
महिलांची ४०० मीटर अडथळा शर्यत शेमिअर लिटेलने जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. एकाच वेळी अमेरिकन आंतर विद्यापीठ व अमेरिकन स्पर्धामध्ये ही शर्यत जिंकणारी २००४ नंतरची ती पहिलीच खेळाडू आहे. तिने हे अंतर ५३.८३ सेकंदांत पार केले. कॅसांड्रा टेट व कोरी कार्टर यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकाविले. राष्ट्रीय विक्रम नोंदविणारी लॅशिंगा देमुसला मात्र जागतिक स्पर्धेचे तिकीट निश्चित करता आले नाही. तिने हे अंतर ५४.४४ सेकंदांत पूर्ण केले.
जोई कोव्हाकसला गोळाफेकीत स्वत:च्या २२.३५ मीटर या विश्वविक्रमाइतकी कामगिरी करता आली नाही. त्याने २१.८४ मीटपर्यंत गोळाफेक करीत प्रथम स्थान मिळवले. ख्रिस्तियन कान्टवेल व जॉर्डन क्लार्क यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. २००७ मध्ये विश्वविक्रम नोंदविणारा रीसे होफाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मात्र २०१४ मध्ये त्याने डायमंड लीग स्पर्धा जिंकली असल्यामुळे त्याचा जागतिक स्पर्धेतील प्रवेश यापूर्वीच निश्चित झाला आहे.
पोलव्हॉल्टमध्ये जेन सुहेरने ४.८२ मीटपर्यंत उडी मारली व विजेतेपद मिळवले. तिने २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. आता तिला विश्वविजेतेपदाची प्रतीक्षा आहे.