२०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीने कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत महिला दुहेरीच्या जेतेपदाला गवसणी घातली. गट्टा-पोनप्पाने नेदरलँडच्या सेलेना पिक आणि एफजे मुस्केन्स या अव्वल मानांकित जोडीचा अवघ्या ३५ मिनिटांत २१-१९, २१-१६ अशा फरकाने धुव्वा उडवला.
पहिल्या गेममध्ये गट्टा-पोनप्पा आणि पिक-मुस्केन्स यांच्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. १९-१९ अशा बरोबरीत असताना भारतीय जोडीने जबरदस्त खेळ करत सलग दोन गुणांची कमाई करून गेम आपल्या बाजूने झुकवला. दुसऱ्या गेममध्ये गट्टा-पोनप्पाने ५-० अशी आघाडी घेत प्रतिस्पर्धीवर दडपण निर्माण केले होते. ही आघाडी नंतर १०-६ व १५-६ अशी वाढवून भारतीय जोडीने सामन्याचे चित्र स्पष्ट केले. मात्र, नेदरलँडच्या जोडीने अप्रतिम खेळ करताना सामन्यात चुरस निर्माण केली. त्यांनी सलग ९ गुणांची कमाई करून १५-१५ अशी बरोबरी साधली, परंतु गट्टा-पोनप्पाने सामन्यावरील पकड सुटू न देता हाही गेम २१-१६ असा जिंकून जेतेपदावर नाव कोरले.

* गट्टा-पोनप्पा या जोडीला गेल्या वर्षभरात आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा, उबेर चषक आणि आशियाई स्पर्धेत कांस्यवर, तर ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पध्रेत रौप्यवर समाधान मानावे लागल होते.
* सय्यद मोदी ग्रां. प्रि. गोल्ड आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्य फेरीत त्यांनी धडक मारली होती, परंतु त्यांना जेतेपद हुलकावणी देत होते.
* २०१२च्या लंडन ऑलिम्पिकनंतर एकत्र आलेल्या गट्टा-पोनप्पा या जोडीचे हे पहिलेच जेतेपद आहे.

हा विजय अविश्वसनीय आहे. आम्ही सर्वोत्तम खेळ केला आणि सातत्य राखले. विश्व अजिंक्यपद स्पध्रेपूर्वी पटकावलेले हे जेतेपद आत्मविश्वास वाढविणारे आहे.  ऑगस्टमध्ये होणारी विश्व अजिंक्यपद स्पर्धा हे पुढील लक्ष्य आहे. ऑलिम्पिकच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे आम्ही सुपर सीरिज स्पर्धापेक्षा काही ग्रां. प्रि. व ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धा खेळण्यावर भर देणार आहोत.
– अश्विनी पोनप्पा