समीर वर्माचे आव्हान संपुष्टात
ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा तसेच मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडीने इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी आगेकूच केली. मात्र समीर वर्माचे आव्हान संपुष्टात आले. ज्वाला-अश्विनी जोडीने इंडोनेशियाच्या फेब्रिआना द्विपुजी कुसुमा आणि रिबका सुगिआर्तो जोडीवर २१-७, २०-२२, २१-१० असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीत मनू-सुमीत जोडीने फिलीपाइन्सच्या पीटर गॅब्रिएल मॅग्नये आणि अल्विन मोराडा जोडीवर २१-१३, २१-१६ अशी मात केली. द्वितीय मानांकित ली चोंग वेईने समीर वर्माचा २१-११, २१-१३ असा पराभव केला.

 

राज्य टेबल टेनिस स्पर्धा शुक्रवारपासून
पुणे : सनिल शेट्टी, दिव्या देशपांडे-महाजन या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह एक हजारहून अधिक खेळाडू राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा तीन जूनपासून येथील सिम्बायोसिस क्रीडा केंद्रात सुरू होत आहे.
आठ जूनपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे, सोलापूर, सातारा, पुणे आदी ठिकाणचे नामवंत खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील युवा मुले व मुलींच्या गटात अनुक्रमे रवींद्र कोटियन व आश्लेषा त्रिहान यांना अव्वल मानांकन मिळाले आहे. कुमार मुलांच्या गटात शौर्य पेडणेकर याला अव्वल मानांकन मिळाले आहे.