भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुखापतग्रस्त झाल्याने तो कोलकाता कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. लोकेश राहुलच्या जागी डावखुऱया गौतम गंभीरचे संघात पुनरागमन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय संघाने सोमवारी कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिमयवर आपल्या ५०० व्या कसोटीत विजय प्राप्त केला. कसोटीच्या दुसऱया दिवशी लोकेश राहुलच्या गुडघ्या जवळचे स्नायू ताणले गेल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते. येत्या शुक्रवारपासून कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीला सुरूवात होणार आहे. या कसोटीत लोकेश राहुल खेळण्याची शक्यता कमीच आहे. लोकेश राहुलला संघाबाहेर बसावे लागल्यास भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून गौतम गंभीरचा विचार केला जाऊ शकतो अशी अटकळ आहे.

गौतम गंभीर भारतीय संघासाठी २०१४ साली इंग्लंड विरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात गंभीरला केवळ तीन धावा करता आल्या होत्या. त्यानंतर गंभीरने राष्ट्रीय संघातील स्थान गमावले होते. संघातून वगळण्यात आल्यानंतर गंभीर गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक क्रिकेट सामन्यांत दमदार कामगिरी करून आपली योग्यता सिद्ध करून दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. याचेच फलित म्हणून गंभीरला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आज गंभीरची फिटनेस टेस्ट देखील घेतली जाणार आहे.

नुकतेच गौतम गंभीरने दुलीप करंडक स्पर्धेत ‘इंडिया ग्रीन’ विरुद्धच्या सामन्यातील दोन डावांत प्रत्येकी ९० आणि ५९ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात ‘इंडिया रेड’ विरुद्ध गंभीरने दोन डावांत प्रत्येकी ९६ आणि ३६ धावांची खेळी साकारून संघाला करंडक जिंकून दिला होता. स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील गौतम गंभीरच्या कामगिरीच्या निकषांवरून त्याला आंतरराष्ट्रीय संघात पुन्हा एकदा स्थान दिले जाण्याचे म्हटले जात आहे.