कबड्डीसारख्या भारतीय खेळाला प्रो-कबड्डीची संजीवनी मिळाली आणि त्याच्या यशाने सारेच थक्क झाले. टीव्हीच्या माध्यमातून आयपीएलच्या धर्तीवरील या लीगने कबड्डीला जनमानसात रुजवले. २०१४चा कबड्डी खेळाचा वेध घेताना हे यश एकीकडे समस्त भारतीयांना सुखावते, तर भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीने ‘सावध ऐका पुढल्या हाका’ ही जाणीव निर्माण होते. आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताच्या मुलींनी आपले सुवर्णपदक निर्विवाद वर्चस्वासह जिंकले, परंतु पुरुष संघाला मात्र इराणने अक्षरश: झगडालायला लावले. त्यानंतर फुकेटला झालेल्या आशियाई समुद्रकिनारी क्रीडा स्पध्रेत भारताच्या महिलांनी सुवर्णपदक जिंकले, पण पुरुषांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

प्रो-कबड्डी लीग : अद्वितीय यश
काही वर्षांपूर्वी कबड्डी प्रीमियर लीग (केपीएल) नामक स्पर्धा झाली होती. परंतु लीगचे व्यावसायिक रूप धारण करण्यात ती पूर्णत: अपयशी ठरली होती. पण चारू शर्मा आणि आनंद महिंद्रा यांनी प्रो-कबड्डीच्या रूपाने जोपासलेले लीगचे स्वप्न ‘न भूतो, न भविष्यती’ असे यशस्वी ठरले. अभिनेते अभिषेक बच्चन आणि काही उद्योगपतींना सोबतीला घेऊन प्रो-कबड्डी लीगचा फॉम्र्युला वास्तवात आला. प्राइम टाइमला रात्री आठ वाजता दाखवल्या जाणाऱ्या सामन्यांनी पाहता पाहता जनमानसाचा वेध घेतला. साँस-बहूंच्या मालिका, क्रिकेट सामने याचप्रमाणे अशा अनेक गोष्टींकडे भारतीयांनी पाठ फिरवली आणि ‘कबड्डी.. कबड्डी..’ हे नाद घराघरांमध्ये घुमू लागले. प्रो-कबड्डीने लोकप्रियतेच्या आकडेवारीत फिफा विश्वचषकालाही मागे टाकले. या स्पध्रेचा आयपीएलप्रमाणे लिलाव झाला. खेळाडूंवर लाखो रुपयांच्या बोली लागल्या. स्टार स्पोर्ट्सने त्याचे सादरीकरण करताना खेळाचे बारकावे आधी शिकून घेतले. त्यानंतर खेळ अतिशय लज्जतदारपणे सादर करण्यात आला. त्यामुळे खेळाडूंना सेलिब्रेटीचा दर्जा मिळू लागला. त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झुंबड उडायला लागली.
या लीगची सुरुवात अभिषेक बच्चनच्या मालकीच्या जयपूर पिंक पँथर्सने पराभवाने केली होती; परंतु नंतर जयपूरने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली. यू मुंबाने दुसरे, तर बंगळुरू बुल्स आणि पाटणा पायरेट्स यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावले. अंतिम सामन्यात जयपूरने यू मुंबाला ३५-२४ अशा फरकाने पराभूत करून विजेतेपदावर नाव कोरले.

आशियाई क्रीडा स्पर्धा : झगडून मिळालेली सुवर्णपदके
१९९०मध्ये बीजिंगला झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत पुरुषांच्या कबड्डीचा प्रथमच समावेश करण्यात आला होता. मग २०१०पासून महिलांच्या कबड्डीला आशियाई स्पध्रेत स्थान देण्यात आले. भारताच्या खात्यावर कबड्डीतील दोन सुवर्णपदके हमखास असायची. पण आता भारताला मक्तेदारी टिकवणे कठीण जाणार आहे. भारताने हक्काने मिळवलेले हे अखेरचे सुवर्णपदक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इराणने अंतिम फेरीत भारताला दिलेली झुंज ही वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे भारतासाठी ही चिंतेची गोष्ट असली तरी खेळासाठी ही चांगली गोष्ट आहे. पुरुष विभागात भारताने प्राथमिक फेरीत बांगलादेश, थायलंड आणि पाकिस्तानचा आरामात पराभव केला. पण उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाने भारताला झुंजवले आणि नंतर अंतिम फेरीत इराणचा संघ जेतेपदाच्या नजीक पोहोचला होता. परंतु दोन गुणांनी मिळवलेल्या निसटत्या विजयामुळे सुवर्णपदक भारताकडे राहिले. महिलांमध्ये प्राथमिक फेरीत भारताने बांगलादेश, दक्षिण कोरियाला सहज हरवले. मग उपांत्य फेरीत थायलंडला पराभूत केले. अंतिम सामन्यात इराणच्या महिलांनीही कडवी झुंज दिली. परंतु भारतीय महिला संघाने सामन्यावरील नियंत्रण मात्र गमावले नव्हते.

फुकेट समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धा : इराणी हिसका
आशियाई स्पध्रेच्या कामगिरीतून खरे तर भारतीय संघाने बोध घेण्याची गरज होती. परंतु त्याचा कोणताही प्रभाव जाणवू न देता सुवर्णपदक आपलेच या नेहमीच्या उत्साहात भारतीय संघ फुकेटला समुद्रकिनारी कबड्डी स्पध्रेत सहभागी झाला. प्राथमिक फेरीत भारताने रोमहर्षक लढतीत थायलंडला ४८-४२ असे, तर बांगलादेशला ४६-२६ असे हरवले. परंतु इराणने मात्र भारतचा ४०-३१ अशा फरकाने पराभव करण्याची किमया साधली आणि कबड्डीविश्वाला त्याची दखल घेणे भाग पडले. त्यानंतर उपांत्य फेरीत पाकिस्तानने भारताचा पराभव करीत आव्हान संपुष्टात आणले. इराणने मग सुवर्णपदकावर नाव कोरले. महिलांमध्ये दक्षिण कोरिया, श्रीलंका, बांगलादेश व थायलंडला हरवून गटविजेत्याच्या थाटात अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात भारताने थायलंडला नामोहरम करत सुवर्णपदक जिंकले.

तात्पर्य
प्रो-कबड्डी लीगच्या यशामुळे कबड्डीचा वेलू गगनावरी पोहोचल्याची ग्वाही मिळाली. कबड्डी पुढील काळात क्रिकेटशी स्पर्धा करू शकेल, हा आशावाद दिसला. परंतु एकीकडे खेळ वाढत असताना भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख मात्र खालच्या दिशेने जाताना दिसत आहे, ही गोष्ट मात्र नक्कीच चिंताजनक आहे. पुढील वर्षी प्रो-कबड्डीची दुसरी आवृत्ती अवतरेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे भारतीय कबड्डीने आत्मपरीक्षण करून सावरण्याची नितांत आवश्यकता आहे.