कोळसेवाडीत १० बाय १२ फुटांच्या बैठय़ा घरात राहणाऱ्या नीलेशला विश्वास

कल्याण पूर्व रेल्वेस्थानकापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कोळसेवाडी परिसरात मंगळवारी आनंदाचे वातावरण पसरले होते. १० बाय १२ चौरस फुटांच्या बैठय़ा घरांच्या या चाळीमध्ये युवा कबड्डीपटू नीलेश साळुंखेचे गुणगान गायले जात होते. याला कारणही तसेच होते. नीलेशला प्रो कबड्डी लीगच्या लिलावामध्ये तेलुगू टायटन्सने ४९ लाख रुपये भाव दिला आहे. महाराष्ट्रातून प्रो कबड्डीमधील सर्वाधिक बोली नीलेशवरच लागल्यामुळे केवळ तो राहात असलेल्या परिसरातच नव्हे, तर राज्यातसुद्धा त्याची विशेष चर्चा आहे.

नीलेशच्या घरी गरिबी पाचवीला पूजलेली. आईने लोकांकडे घरकामे केली आणि वडिलांना तुटपुंज्या पगाराची नोकरी. याच बळावर नीलेशसह चार मुलांना त्यांनी मोठे केले. आता कबड्डीच्या माध्यमातून पैसे मिळाल्यावर आई-वडिलांना या वयात काबाडकष्ट करायला लावायचे नाही, असा निर्धार नीलेशने केला आहे. प्रो कबड्डीची बातमी कळल्यावर काय वाटतेय, या प्रश्नाला उत्तर देताना नीलेश म्हणाला, ‘‘माझ्यावर अभिनंदनाचा वर्षांवच जणू सुरू आहे. कधी वाटले नव्हते कबड्डी आपल्याला हा दिवस दाखवेल. आता खेळात अजून प्रभाव दाखवायचा आणि पुढील लिलावात आणखी मोठी बोली जिंकायची आहे. कारण कबड्डी हा खेळ माझी सारी स्वप्ने पूर्ण करू शकतो, हा आत्मविश्वास या खेळाने मला दिला आहे.’’

शिवशंकर क्रीडा मंडळाचे प्रतिनिधित्व करणारा नीलेश पुढे म्हणाला, ‘‘अनेक कबड्डी स्पर्धामध्ये खेळाची चुणूक दाखवून दोन बाइक्स, दोन फ्रिझ, वॉशिंग मशीन, एलसीडी, डीव्हीडी, सोन्याचे पान, चैन अशा बऱ्याच बक्षिसांची कमाई केली आहे. पण ही सारी संपत्ती ठेवण्यासाठी आधी घर अपुरे पडायचे. मागील हंगामात मिळालेल्या पैशातून घर घेतले आहे. त्याचे थोडे कर्ज फेडायचे आहे. तसेच भावालासुद्धा घर घ्यायला मदत करायची आहे. आता माझे छोटे घर आहे. परंतु मोठे आलिशान घर घेण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले आहे. माझ्या आवडत्या खेळामुळे ते नक्की पूर्ण होईल.’’प्रो कबड्डीमुळे आयुष्यात झालेल्या बदलाबाबत नीलेश म्हणाला, ‘‘प्रो कबड्डीमुळे माझ्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. माझे आयुष्यच जणू पालटले आहे. आईबाबांना माझा सार्थ अभिमान वाटतो. आता आयुष्य छान जाईल, असे ते म्हणतात.’’

सूरज देसाईची भरारी

सेनादलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि पुणे शहरातील संघाकडून स्थानिक कबड्डी खेळणाऱ्या सूरज देसाईला दबंग दिल्लीने ५२ लाख ५० हजार अशी दुसऱ्या दिवसातील सर्वाधिक किमतीची बोली लावली. पाटणा पायरेट्सने जयदीप सिंगसाठी ५० लाख, तर यू मुंबाने बचावपटू सचिन कुमारसाठी ४६ लाख भाव दिला. मणिंदर सिंगला ४४ लाख ५० हजार रुपयांना बंगालने खरेदी केले.

नीलेशला महाराष्ट्रातून सर्वाधिक ४९ लाखांची बोली

प्रो-कबड्डी लीगच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील काशिलिंग आडकेने ४८ लाखांपर्यंत झेप घेत सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र दुसऱ्या दिवशी नीलेश साळुंखेने त्याला मागे टाकत अग्रस्थानावर मुसंडी मारली. तिसरे स्थान जरी रिशांक देवाडिगाने (उत्तर प्रदेश – ४५.५० लाख) कायम राखले असले तरी बाजीराव होडगेने (दबंग दिल्ली) ४४ लाख ५० हजारांची बोली जिंकत चौथे स्थान मिळवले आहे. याशिवाय संकेत चव्हाण (जयपूर पिंक पँथर्स) – २४ लाख, आनंद पाटील (दबंग दिल्ली) – २०.५० लाख, सुल्तान डांगे (गुजरात) – १६.६० लाख, तुषार पाटील (तामिळनाडू) – १५.२० लाख, उमेश म्हात्रे (पुणेरी पलटण) – १५ लाख, विकास काळे (गुजरात)- १२.६० लाख, विराज लांडगे (दबंग दिल्ली) – ८ लाख, शशांक वानखेडे (बंगाल वॉरियर्स) – ८ लाख,  स्वप्निल शिंदे (दबंग दिल्ली) – ८ लाख, शुभम पालकर (दबंग दिल्ली) – ६.१० लाख, सारंग देशमुख (तामिळनाडू) – ६ लाख, हरीश नाईक (बेंगळूरु बुल्स) – ६ लाख, मयूर शिवथरकर (हरयाणा) – ६ लाख या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लक्षवेधी किंमत मिळवली.