‘‘पोरा, आधी पायावर उभं रहाय. परिस्थिती नाय आपली. त्यात तुझा हातपाय मोडला तं, तुला कशी मिळंल चांगली नोकरी?’’

अकरावीत शिकणारा उदयोन्मुख कबड्डीपटू ज्ञानेश्वर देशमुख याचे शेतमजूर आईवडील त्याला सतत हेच सांगत असतात. ज्ञानेश्वरने मात्र मनाची पक्की तयारी केली आहे. तो सांगतो, ‘‘मला मोठ्ठा कबड्डीपटू व्हायचंय. प्रो कबड्डीत किंवा भारताकडून खेळायचंय; पण नशिबानं पुढं काय वाढून ठेवलंय, हे माहीत नाही. बारावी झाली की नोकरी शोधायला लागेल, तरच घरचं बस्तान बसेल.’’ कबड्डीपटू होण्याचं स्वप्न त्याला अस्वस्थ करतेय, तर दुसरीकडे घरच्या गरिबीमुळे बारावी उत्तीर्ण होताच नोकरी पत्करण्याचं दडपण त्याच्या मार्गावर जणू काटेरी कुंपण घालतं आहे.

ज्ञानेश्वरसारखाच लहू राठोड. तो दहावीत शिकतो. त्यालाही अनुप कुमार, राकेश कुमार यांच्याप्रमाणे आपलं नाव कमवायचं आहे. फरक इतकाच, की त्याच्या आईवडिलांना त्याच्या खेळाचं अप्रूप वाटतं. त्यांचाही उदरनिर्वाह शेतावर काम करून चालतो. त्यामुळे लहूचं खेळातील भवितव्यसुद्धा तसं अधांतरीच आहे.

प्रशिक्षक ज्ञानेश्वर ठोंबरे यांची कहाणीसुद्धा तशीच आहे. परिस्थितीचं चक्रव्यूह भेदू न शकल्यामुळे कबड्डीपटू होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं. आता खेळाडू घडवण्याच्या त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. अनेकांच्या पालकांना खेळाचं महत्त्व पटवून द्यावं लागतं, असं ठोंबरे सांगतात.

ज्ञानेश्वर-लहू या विद्यार्थ्यांप्रमाणे अनेक उगवत्या खेळाडूंच्या आणि प्रशिक्षकांच्या बोलण्यातून परभणीच्या कबड्डीचं हेच वास्तव अधोरेखित होतं. नुकत्याच मंचर येथे झालेल्या किशोर गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत परभणीने विजेतेपदाला गवसणी घातली. गेल्या अनेक वर्षांचा परभणीच्या कबड्डीचा वेध घेतल्यास किशोर-कुमार किंवा शालेय गटात दिसणारी विलक्षण गुणवत्ता मग वरिष्ठ संघापर्यंत टिकत नसल्याचं सत्य समोर येत आहे. याला परभणीतील सामाजिक स्थिती जबाबदार आहे.

परभणीत रोजगार कमी असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी शेतमजुरीवर आणि राज्यातील किंवा राज्याबाहेरील ऊसतोडणी कामावर येथील कुटुंबं पोसली जातात. ऊन, वारा, पाऊस, थंडी या कशाचीही तमा न बाळगता ही कुटुंबं शेतमजुरी किंवा ऊसतोडणीचं काम करतात. ऊसतोडणी करणाऱ्यांना वर्षांतील निम्मे दिवस गावी आणि निम्मे साखर कारखान्यावर काढावे लागत असल्याने मुलाबाळांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होतो, कारण मुलगा-मुलगी काम करण्याच्या वयात आली की, त्यांनासुद्धा या मजुरीच्या कामाला जुंपण्यात येते. याचप्रमाणे बंजारा समाजही या परिसरात मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यांचे तांडे (समाजाची वस्ती) आपला संसार पाठीवर टाकून पोटासाठी दर काही काळानं नवा मुक्काम थाटतात. जिथे नेहमीच्या जेवणाची भ्रांत, तिथं खेळ जपणं, खेळाडू होणं यांसारख्या गोष्टींना त्यांच्या आयुष्यात कितपत थारा असणार?

 

महिला कबड्डीचीही वाट खुंटलेली

ल्ल परभणीतील महिलांच्या कबड्डीची वाटचालसुद्धा खुंटली आहे. आईवडिलांची मोलमजुरी, बालविवाह आणि सायंकाळचे सामने ही त्याची प्रमुख कारणे आहेत. सावित्रीबाई फुले कन्याशाळेच्या प्राचार्य जया जाधव यांनी महिला कबड्डीचे विश्लेषण करताना सांगितले की, ‘‘आमच्या भागात बालविवाह आजही मोठय़ा प्रमाणात होतात. त्यामुळे आठवी ते दहावीपर्यंतच्या बऱ्याचशा मुलींबाबत विवाह झाला म्हणून शिक्षण थांबतं, स्वाभाविकपणे खेळ थांबतो. मुलींना शाळा आणि पुस्तकं मोफत आहे; परंतु प्रचार-प्रसार अभियान राबवूनही समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल होत नाही. कबड्डीच्या सामन्यांमुळे होणारा उशीरसुद्धा घरची मंडळी सहन करीत नाहीत.’’

ल्ल ‘दंगल’ चित्रपटातून प्रेरणा घेऊन मानवत स्पोर्ट्स अकादमीचा मुलींचा संघ नुकताच निर्माण झाला आहे आणि पाहतापाहता या गावातील १५-२० मुली नियमित खेळू लागल्या आहेत. या संघातील साक्षी चव्हाण ही आठवीतील विद्यार्थिनी म्हणते, ‘‘प्रो कबड्डी गेली काही वष्रे टीव्हीवर मी आवर्जून पाहते. त्यामुळेच हा खेळ खेळायची प्रेरणा मिळाली. माझ्या आईने दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी खेळत राहणार आहे.’’

 

परभणीच्या कबड्डीची वाटचाल

परभणीत कबड्डीला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला तो १९८३ मध्ये. नाना बापट यांनी मराठवाडय़ामध्ये संघटनात्मक बांधणीमध्ये सिंहाचा वाटा उचलला. त्या वेळी परभणी आणि हिंगोली हे जिल्हे एकत्रित होते. कालांतराने ते स्वतंत्र झाले. माजी मंत्री सुरेश वरपूडकर, डॉ. भीमराव निरवळ, प्रा. सुरेश जाधव, प्रा. के. एस. शिंदे, मंगल पांडे, माधव शेजूळ यांच्यासारखे संघटक आणि पप्पा कुलकर्णी, रावसाहेब जामकर, राजाभाऊ वडगावकर, गुरुदास तलरेजा, उद्धवराव सोळंके, श्रीमंत कदम, शेख नदीम, माणिक राठोड, दिगंबर जाधव, हरिश्चंद्र खुपसे, माधव शेवाळ यांच्यासारख्या खेळाडूंनी या जिल्ह्य़ाच्या कबड्डीची पताका फडकवत ठेवली. सरस्वती व्यायाम प्रसारक मंडळ, कोल्हा स्पोर्ट्स क्लब, साई क्रीडा मंडळ, यशवंतराव चव्हाण व्यायाम प्रसारक मंडळ, महारुद्र क्रीडा मंडळ, छत्रपती क्रीडा मंडळ, महाविष्णू क्रीडा मंडळ यांच्यासारख्या कबड्डी मंडळांची परंपरा मोठी आहे. सध्या परभणी जिल्ह्य़ातील पुरुष गटात ४६ आणि महिला गटात २८ संघ खेळतात. याशिवाय जिल्ह्य़ात ४०० शाळा आणि ७० महाविद्यालये अस्तित्वात आहेत. त्यामुळेच इथलं किशोर-कुमार आणि शालेय कबड्डी समृद्ध आहे. कबड्डीला उत्तेजन देण्यासाठी परभणी महानगरपालिकेतर्फे दर आठवडय़ाला १४ आणि १७ वर्षांखालील वयोगटासाठी शालेय स्पर्धा घेतल्या जातात. यात जिल्ह्य़ातील आठ संघ सहभागी होतात.

कबड्डीच्या नकाशावर परभणीचं स्थान मराठवाडय़ातील एक जिल्हा म्हणून जरी असलं तरी त्याचा स्वत:चा असा रुबाब आहे. येथील कबड्डीला खरी रसद ही या शैक्षणिक संस्थांकडूनच मिळते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे दहावी-बारावी होताच नोकरीची करण्यात येणारी अपेक्षा यामुळे कबड्डीचा विकास योग्य पद्धतीने होत नाही.  – मंगल पांडे, परभणी कबड्डी असोसिएशनचे सचिव