हुतात्मा स्मारक इस्लामपूर, तालुका-वाळवा, जिल्हा सांगली.. हा आहे कबड्डीचं इस्लामपुरी पॅटर्न सिद्ध करणाऱ्या इस्लामपूर व्यायाम मंडळाचा पत्ता. १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या उमाशंकर पंडय़ा आणि विष्णू बारपटे या हुतात्म्यांचे हे स्मारक. आता देशासाठी गुणी कबड्डीपटू घडवण्याचं कार्य येथे चालू असल्यानं त्या हुतात्म्यांना ही जणू यथोचित मानवंदनाच आहे. आनंदराव वडार ऊर्फ तात्या खेळाडू हेरतात आणि प्रशिक्षक पोपट पाटील त्यांच्यातील कौशल्य विकसित करून त्यांना तरबेज करतात. यासाठी सुरुवातीला अनेक मुलांच्या घरोघरी जाऊन पालकांना पटवून द्यायला लागायचं. आता ३२ वष्रे हा वसा अविरत सुरू आहे.

इस्लामपूर शहराचा क्रीडा इतिहास समृद्ध आहे. पासिंग व्हॉलीबॉल खेळही इथे मोठय़ा प्रमाणात खेळला जातो. इस्लामपूर व्यायाम मंडळाची स्थापना १९८२ मध्ये झाली. १९८४ मध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांचं निधन झालं. बापूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ कबड्डी आणि व्हॉलीबॉलच्या स्पर्धा सुरू करण्याचे ठरवण्यात आले. याशिवाय जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब आणि शरीरसौष्ठवच्या स्पर्धाही झाल्या. राज्यातील उत्तम खेळाडू विकसित व्हावा, हाच या मागील उद्देश होता.

आधी फक्त स्पर्धा घेण्यात समाधान मानणाऱ्या इस्लामपूर मंडळानं जानेवारी १९८५ मध्ये वार्षिक स्पर्धा संपताच प्रत्यक्ष मैदानावर प्रवेश केला. सामन्यांसाठी आखलेल्या मैदानांवर खेळण्यात लहान मुलांना विलक्षण आनंद मिळत होता. पाहिलेल्या खेळाच्या स्पर्धाप्रमाणेच ते आपला खेळ करू लागले. १९८७मध्ये नागठाणे येथे झालेल्या ३५ किलो वजनी गटात इस्लामपूर मंडळानं प्रथमच विजेतेपद मिळवण्याची किमया साधली. तेव्हापासून या संघाच्या वर्चस्वाची यशोगाथा सुरू झाली. सुरुवातीला हा संघ खेळावं या इराद्यानं खेळायचा, त्यानंतर जिंकण्यासाठी खेळायला लागला. आताही काही अपवाद वगळल्यास हा संघ सांगलीमधील कोणत्याही स्पध्रेत हमखास अंतिम फेरीत असतो. शासकीय निधी शून्य असल्यामुळे पूर्वी पदरमोड करून संस्थेचं अर्थकारण चालायचं. आता पुरेशा प्रमाणात बक्षिसांच्या उत्पन्नावर अर्थकारण चालतं. मात्र कुणापुढेही या संस्थेनं हात पसरले नाहीत. या संस्थेच्या जडणघडणीत हेमंत भावसार यांचासुद्धा महत्त्वाचा वाटा आहे.

संघाच्या यशाचं गुपित मांडताना पोपट पाटील म्हणाले, ‘‘कष्ट, सातत्य आणि शिस्त ही यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक स्थानासाठी सध्या माझ्याकडे किमान तीन खेळाडू आहेत. माझ्या बळावर संघ आहे, अशा प्रकारचा अहंकार कोणत्याही खेळाडूचा जोपासला जात नाही. मैदानावरील रणनीतीबाबत सांगायचं तर, इतिहासाची मला अतिशय आवड आहे. चढायांपेक्षा क्षेत्ररक्षण महत्त्वाचं. मैदान जिंकायचं असेल, तर प्रतिस्पध्र्याच्या सेनापतीला गारद करायला हवं. मोहित चिल्लर, सुरेंदर नाडा यांच्यासारख्या अनेक कबड्डीपटूंना चांगली बोली लागते, हे याचं आदर्श उदाहरण ठरू शकेल.’’

खेळाडू घडवण्याच्या इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या प्रक्रियेविषयी पाटील म्हणाले, ‘‘कबड्डीत खरं तर मर्कटलीलाच असतात. वानराप्रमाणेच खेळाडू कशाही उडय़ा मारतो. नेमके असेच पदलालित्य आणि पळापळ करणारा खेळाडू आम्ही हेरतो. त्यानुसार त्याच्यातील कोणते कौशल्य विकसित करायचे, हे आम्ही ठरवतो. रोजच्या सरावातून हे आम्हाला कळतं. खेळाडूचा नैसर्गिक खेळ न बदलता बारकावे सांगत त्याचा खेळ विकसित करतो. डावे मध्यरक्षक दुर्मीळ असतात. कमी उंची आणि घरची परिस्थिती हे मुद्देसुद्धा मी मध्यरक्षणाची जबाबदारी सोपवताना गृहीत धरतो.’’

छडी लागे छमछम, कबड्डी येई..

संघातील तंदुरुस्ती आणि शिस्तीविषयी पाटील म्हणाले, ‘‘लांब पल्ल्याचे धावणे, डोंगर चढणे, कुस्ती, तंदुरुस्ती, मसाज, आदी गोष्टींचा तंदुरुस्तीमध्ये अंतर्भाव असतो. तंदुरुस्तीच्या बाबतीत शिस्त अधिक महत्त्वाची असते. माझ्या छडीचा धाक खेळाडूंवर असतो. मी नियोजित वेळेच्या पाच मिनिटे आधीच पोहोचलेला असतो, त्यामुळे दिरंगाईनं येणाऱ्या मुलांची गय केली जात नाही. खेळातील शैली दाखवा, पण आणखी काही दाखवू नका!’’ ते पुढे म्हणाले, ‘‘आजही मॅटवर अतिशय कमी स्पर्धा होतात. खेळाडूला माती आणि मॅट असा दोन्ही सराव हवा. आमच्याकडे वय-उंचीनुसार तीन सत्रांत सराव चालतो. त्यामुळे प्रत्येक सत्राच्या खेळाडूंना मॅटवर सरावाचीही संधी मिळते.’’

नितीन आणि प्रो कबड्डीचं यश प्रेरणादायी

अविनाश पाटील, सुनील कुंभार, जयवंत पाटील, सतीश मोरे, संजय जाधव, संजय वडार, संदीप कदम, रवींद्र पाटील, राहुल जाधव, धनाजी जाधव, सचिन पाटील, संतोष पाटील हे इस्लामपूरचे गाजलेले खेळाडू. नितीन मदने, सचिन शिंगार्डे हे ताज्या दमाचे खेळाडू आता मैदान गाजवत आहेत. नितीननं प्रो कबड्डीमुळे नावलौकिक मिळवला. भारतीय संघातही स्थान मिळवलं. नुकतंच महाराष्ट्र शासनाकडून तहसीलदारपद मिळालेल्या नितीनच्या यशाबाबत पाटील म्हणाले, ‘‘नितीनच्या पराक्रमाचा आम्हा इस्लामपूरवासीयांना सार्थ अभिमान वाटतो. आपल्या गावातला मुलगा दररोज टीव्हीवर खेळताना दिसतो, खेळाद्वारे लाखो रुपये उत्पन्न मिळते. हे मुलांना-पालकांना कबड्डीच्या मैदानाकडे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरू लागले आहे. प्रो कबड्डीच्या आधी खेळाला मरगळ आली होती. खेळ संपतो की काय, अशी भीती वाटत होती. कारण काही मोजके संघच खेळत होते.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘प्रो कबड्डी टीव्हीवर दिसू लागल्यापासून मुलांच्या खेळामध्ये अतिशय सुधारणा पाहायला मिळत आहे. लाथ कशी मारायची, दाद कशी मागावी, गुण घेतल्यावर आनंद कशा रीतीने साजरा करायचा, हे प्रतिबिंब आता सर्वत्र दिसू लागले आहे. आधी हे मुलांना सांगायला लागायचं. गेल्या दोन वर्षांत ही मोठी प्रगती खेळात पाहायला मिळाली आहे.’’