आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धासाठी आवश्यक असणारी अनुभवाची शिदोरी महाराष्ट्राच्या खेळाडूंना मिळावी, यासाठी महाकबड्डी लीग हे उत्तम व्यासपीठ असणार आहे. आम्ही कबड्डीपटूंचा विकास हाच k16केंद्रबिंदू मानून या स्पर्धेचे आयोजन करीत आहोत, असे महाकबड्डीचे मुख्य प्रवर्तक व माजी राष्ट्रीय प्रशिक्षक शांताराम जाधव यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित केलेली पहिली महाकबड्डी लीग १५ मेपासून सुरू होत आहे. राज्यस्तरावर प्रथमच या लीगचा प्रयोग होत आहे. ही स्पर्धा होणार असल्याची चर्चा बरेच दिवस सुरू होती. अखेर या स्पर्धेस मुहूर्त लाभला आहे. या स्पर्धेच्या स्वरूपाविषयी व त्यापासून खेळाडूंना कसा लाभ होणार आहे, या विषयी अर्जुन पुरस्कार विजेते जाधव यांच्याशी केलेली खास बातचीत-

प्रो-कबड्डी लीगला मिळालेले यश पाहून या लीगची संकल्पना सुचली काय?
ही लीग व्हावी यासाठी मी गेली चार वर्षे प्रयत्न करीत होतो. आयपीएल स्पर्धेच्या भव्य यशानंतर महाराष्ट्रात बॅडमिंटन, टेनिस, बुद्धिबळ आदी काही खेळांच्या लीग स्पर्धा सुरू झाल्या व त्यांनाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे पाहून मी आमच्या संघटनेत गेली तीन-चार वर्षे सातत्याने याबाबत पाठपुरावा करीत होतो. प्रो-कबड्डी लीगला मिळालेली प्रसिद्धी व आर्थिक सहकार्य पाहून आमच्या संघटनेतील सहकाऱ्यांनी माझी संकल्पना उचलून धरली. सुदैवाने मॅक्स गॉडवीट या स्पोर्ट्स संयोजन कंपनीनेही या लीगसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळेच लवकरच महाकबड्डी लीगचे स्वप्न साकार होणार आहे.

या लीगचा फायदा महाराष्ट्राच्या नवोदित खेळाडूंना होईल काय?
होय, निश्चितच. आम्ही प्रत्येक संघात तीन कनिष्ठ गटातील खेळाडूंना संधी देणार आहोत. या लीगमध्ये विविध ठिकाणच्या खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळणार असल्यामुळे कनिष्ठ व उदयोन्मुख खेळाडूंना वरिष्ठ खेळाडूंकडून खूप काही शिकायला मिळणार आहे. तसेच विविध नवनवीन तंत्रज्ञान व शैलीचीही त्यांना माहिती होणार आहे. त्याचा फायदा या लीगमधील खेळाडूंना भावी कारकीर्दीसाठी होईल. हे खेळाडू जेव्हा प्रो-कबड्डी किंवा अन्य व्यावसायिक स्पर्धेत खेळतील तेव्हा महाकबड्डी लीगमधील अनुभव त्यांना उपयोगी पडेल. आम्ही ही लीग दोन मोसमात घेत असल्यामुळे ज्या खेळाडूंना आता संधी मिळालेली नाही अशा खेळाडूंना पुढच्या मोसमात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वानाच संधी मिळणार आहे.
महाकबड्डी लीगला प्रेक्षकांचा कितपत पाठिंबा मिळेल?

प्रो-कबड्डी लीगने अवघ्या काही दिवसांत लोकांची मने जिंकली आहेत. ज्यांनी कधी कबड्डी हा खेळ फारसा पाहिला नव्हता, असे लोकही प्रो-कबड्डीला येत होते व खेळाचा आनंद घेत होते. हे लक्षात घेता आमच्या लीगलादेखील प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा मिळेल अशी खात्री वाटते. आम्ही खेड (रत्नागिरी), अलिबाग, वडाळा, अहमदनगर, बारामती आदी ठिकाणी हे सामने घेणार आहोत. या लीगमध्ये महिला गटाचेही सामने असल्यामुळे प्रेक्षकांना महिला खेळाडूंचेही कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे. साधारणपणे ८ ते १० हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी गॅलरी तेथे असेल. ही गॅलरी अपुरी पडेल अशी मला पक्की खात्री आहे.
या लीगकरिता प्रेक्षकांना मोफत प्रवेश राहणार आहे काय?

प्रो-कबड्डी लीगकरिता ४०० रुपयांचे तिकीट असूनही सर्व गॅलऱ्या खचाखच भरलेल्या असत. त्यामुळे महाकबड्डी लीगला आम्ही प्रेक्षकांना परवडेल असे तिकीट शुल्क ठेवणार आहोत. कारण तिकिटाद्वारे चांगले उत्पन्न मिळू शकते व ही संधी आम्ही का सोडायची? तसेच तिकिटे ठेवली की चांगल्या दर्जाचे प्रेक्षक येतात.
लीगपासून राज्य संघटनेला मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग कसा केला जाणार आहे?

लीगमधील प्रत्येक फ्रँचाईजीकडून २० लाख रुपये शुल्क आम्हाला मिळणार आहे. त्याचा उपयोग उदयोन्मुख खेळाडूंच्या विकासाकरिता केला जाणार आहे. आम्ही लवकरच राज्यस्तरावर प्रशिक्षण अकादमी स्थापन करणार आहोत. या अकादमीत १६ ते २० वर्षे वयोगटातील खेळाडूंना वर्षभर प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अकादमीत तयार झालेले खेळाडू महाकबड्डी लीग, प्रो-कबड्डी लीग आदी स्पर्धासाठी उपलब्ध होतील. त्याच त्याच खेळाडूंना प्रशिक्षण न देता राज्यस्तरावरील नैपुण्यवान खेळाडूंना आलटून-पालटून प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे वरिष्ठ गटात राष्ट्रीय स्तरावर आमच्या खेळाडूंची कामगिरी अव्वल दर्जाची होईल अशी मला खात्री आहे.