भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर, सुनील गावस्कर आणि नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या उपस्थितीत बुधवारी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. भारतीय संघासाठी १९८३ साली विश्वचषक जिंकून देणाऱया कपिल देव यांना भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि लेजड्ंस क्लबचे अध्यक्ष माधव आपटे यांच्या हस्ते कपिल देव यांना ‘हॉल ऑफ फेम’चे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारे पहिले फलंदाज सुनील गावस्कर यांचाही प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. गावस्कर यांचा याआधीच ११ जुलै २०१३ साली क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

वाचा: धोनीनेच संघाचे नेतृत्व करावे, कोहलीवरील ‘विराट’ चर्चेवर कपील देव यांचे मत

 

पुरस्कार स्विकारल्यानंतर कपिल देव म्हणाले की, देशातील प्रत्येक युवा क्रिकेटपटूला सुनील गावस्करसारखा उत्कृष्ट खेळाडू होण्याची इच्छा आहे. त्यांच्यानंतर अनेक क्रिकेटपटू येतील आणि आपल्या कौशल्याने सर्वांची मनं जिंकतील पण गावस्करांचे नाव नेहमी अव्वल स्थानावर राहिल. क्रिकेट खेळण्याचे आम्हाला वेड होते आणि पुरस्कारांकडे आम्ही कधीच लक्ष दिले नाही. संघाच्या यशामुळे चाहत्यांना आनंद मिळाला की आम्हाला खूप भारी वाटायचे, असेही कपिल देव म्हणाले.

वाचा: पुन्हा अनुभवता येणार १९८३ विश्वचषक विजयाचा थरार