४४-वर्धापनदिन विशेष अंक

आविष्कार देशमुख, अविनाश पाटील, तानाजी काळे, दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे, सचिन कांकरिया, सतीश कामत, संतोष विणके

मुलींनी खेळायचे ते टिपरीपाणीसारखे नाजूक खेळ आणि मुलांनी खेळायचे ते अंगातली रग जिरवणारे खेळ ही पारंपरिक समजूत मुलींनी केव्हाच धुडकावून लावली आहे. अलीकडच्या आलेल्या ‘दंगल’ सिनेमाने ते अधोरेखित केलं इतकंच. म्हणूनच ‘लोकप्रभा’ने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या खेळांमधल्या ‘गीता-बबिता फोगट’चा शोध घेतला. त्यातून दिसलेलं चित्र निश्चितच आशादायी आहे. मुलींमध्ये क्रीडा क्षेत्रात पाय रोवून उभं राहण्याची इच्छा आहे, पालकांचं सहकार्यही आहे. आता गरज आहे ती क्रीडा संस्कृती विकसित होण्याची.

05-women-sportperson

ज्युदो, कुस्ती व कबड्डी या खेळांतील मुलांची मक्तेदारी हटवत या खेळांतील पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर तालुक्यातील पळदेवच्या अंकिता अजितकुमार शहा हिने कुस्तीसारख्या खेळात राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवण्यापर्यंत मजल मारली आहे. तिचा हा प्रवास ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी असून तिच्या पावलावर पाऊल ठेवून इंदापूर तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील अनेक मुलींनी ज्युदो, कुस्ती व कबड्डीमध्ये यश मिळविले आहे.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून विस्थापित झालेले पळसदेव हे इंदापूर तालुक्यातील पुनर्वसित गाव. अंकिताच्या घरात खेळाची कोणतीही परंपरा नव्हती. मात्र तिची खेळाची आवड ओळखून वडील अजितकुमार शहा व आई प्राची शहा यांनी अंकिताला सहावीत असताना सांगली येथील शांतिनिकेतन सैनिकी प्रशिक्षण शाळेतील प्रशिक्षण शिबिरात पाठवले. तेथील प्रशिक्षणामुळे खेळाचे तंत्र तिला अवगत झाले. त्यानंतर तिने इंदापूर येथील मार्शल स्पोर्ट्स अॅखकॅडमीत ज्युदो, कराटे व तायक्वांदोचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले. शालेय वयामध्ये ब्लॅकबेल्ट मिळवून तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दहावीत परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत तिने रौप्य पदक मिळवले. बारावीत असताना बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर भोपाळ येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. असे यश मिळवणारी अंकिता तालुक्यातील पहिली खेळाडू ठरली.

इंदापूर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिने कुस्ती व कबड्डी या खेळांवर लक्ष केंद्रित केले. या दरम्यान कुस्ती क्षेत्रात ग्रामीण भागात मुलीही धाडसाने पुढे येऊ लागल्या होत्या. महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. सदाशिव खरोसेकर, सचिव मुकुंद शहा, अंकिताचे काका डॉ. शीतलकुमार शहा, प्रा. बाळासाहेब खटके, कुस्ती कोच मारुती मारकर यांनी तिला मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. गुलबर्गा येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली. गुजरातमध्ये नडियादच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून तिने तालुक्याचा बहुमान वाढविला.

पदवीधर होताच प्रशस्तीपत्रके आणि मिळालेली पदके घेऊन तिने सरकारी नोकरीसाठी पायपीट केली. सहकार विभागातील खेळाडूंच्या जागेसाठी तिने परीक्षा दिली. त्यात ती उत्तीर्णही झाली. परंतु तिची निवड झाली नाही. तिला प्रतिक्षा यादीत असल्याचे सांगण्यात आले. अंकिता आता लग्न होऊन नांदायला गेली आहे. प्रतीक्षा यादीतील तिचे नाव पुढे कधी येते आहे, याची प्रतीक्षा कधी संपणार, हा प्रश्न अंकिताला निरुत्तर करीत आहे.
तानाजी काळे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा