उत्कंठापूर्ण लढतीत आपलाच सहकारी पीटर स्विडलरवर मात

रशियाचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर सर्जी कर्जाकिन याने जागतिक चषक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदावर आपली मोहर उमटवली. त्याने उत्कंठापूर्ण लढतीत आपलाच सहकारी पीटर स्विडलरवर ६-४ अशी मात केली.

हे दोन्ही खेळाडू विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनचा आव्हानवीर ठरवण्यासाठी होणाऱ्या चॅलेंजर स्पर्धेकरिता पात्र ठरले आहेत. चॅलेंजर स्पर्धेत पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद, बल्गेरियाचा व्हॅसेलीन तोपालोव्ह, अमेरिकेचे फॅबिआना कारुआना व हिकारू नाकामुरा यांचा समावेश आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे.

कर्जाकिनने स्विडलरविरुद्ध ०-२ अशा पिछाडीवरून २-२ अशी बरोबरी साधली. स्विडलरला विजेतेपदासाठी उर्वरित दोन डावांमध्ये केवळ अध्र्या गुणाची आवश्यकता होती, मात्र दडपणाखाली त्याने अक्षम्य चुका करीत दोन्ही डाव गमावले. त्यामुळे टायब्रेकर डावांचा उपयोग करण्यात आला. पहिल्या जलद डावात स्विडलरला पराभव पत्करावा लागला. मात्र त्याने पुढचा डाव घेत बरोबरी साधली. ब्लिट्झ पद्धतींच्या दोन डावांमध्ये कर्जाकिन याने सफाईदार विजय मिळवत विजेतेपद निश्चित केले.

जागतिक चषक स्पर्धेत भारताच्या सहा खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यापैकी एस.पी.सेतुरामनने तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याने दुसऱ्या फेरीत आपलाच वरिष्ठ सहकारी पी. हरिकृष्णवर सनसनाटी विजय मिळविला होता. परंतु नंतर त्याला प्रभाव दाखवता आला नाही.