कर्नाटकने गतविजेत्यास साजेशी कामगिरी करीत रणजी क्रिकेट स्पर्धेत पुन्हा अंतिम फेरी गाठली. त्यांनी तुल्यबळ मुंबई संघावर ११२ धावांनी विजय मिळविला.
मुंबई संघाने शनिवारी ६ बाद २७७ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. त्या वेळी त्यांना विजयासाठी आणखी १६८ धावांची आवश्यकता होती. या मोसमात सातत्यपूर्ण खेळणारा सिद्धेश लाड याच्यावर त्यांची मुख्य मदार होती. अन्य चार गडय़ांच्या साथीत तो किती लढत देणार याचीच उत्सुकता होती. मात्र आणखी ५५ धावांमध्ये त्यांनी उर्वरित विकेट्स गमावल्या. लाड याने झुंजार खेळ करीत ७४ धावा केल्या. कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुन याने चार बळी घेत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
लाड याच्या कामगिरीबाबत उत्कंठा होती. मात्र त्याचे अर्धशतक वगळता कर्नाटकच्या गोलंदाजांनीच वर्चस्व गाजविले. लाड याचा सहकारी अभिषेक नायर हा जखमी असल्यामुळे फलंदाजीस पुन्हा येऊ शकला नाही. त्याच्या जागी आलेल्या बलविंदरसिंग संधू (कनिष्ठ) याला बाद करीत मिथुन याने विजयाच्या मार्गातील पहिला अडसर दूर केला. शार्दूल ठाकूर याने दोन चौकार मारीत चांगली सुरुवात केली. मात्र फिरकी गोलंदाज श्रेय गोपाळ याच्या षटकात त्याने स्लीपमध्ये कर्नाटकचा कर्णधार आर.विनयकुमार याच्याकडे झेल दिला. ही पडझड होताना एका बाजूने चिवट झुंज देणारा लाड याला बाद करीत श्रीनाथ अरविंद याने कर्नाटकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लाड याने आठ चौकार व एक षटकारासह ७४ धावा केल्या.
कर्नाटकच्या मिथुन याने ६९ धावांमध्ये चार बळी घेतले. अरविंद व गोपाळ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पहिल्या डावात सहा बळी घेणाऱ्या विनयकुमार याला सामन्याचा मानकरी पारितोषिक मिळाले.
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक : २०२ व २८६ मुंबई : ४४ व ३३२ (आदित्य तरे ९८, अखिल हेरवाडकर ३१, श्रेयस अय्यर ५०, सूर्यकुमार यादव ३६, सिद्धेश लाड ७४, अभिमन्यू मिथुन ४/६९, श्रीनाथ अरविंद २/६४, श्रेयस गोपाळ २/६८)