फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर कर्नाटकने सर्वोत्तम कामगिरी करीत गतवर्षीप्रमाणेच रणजी करंडकापाठोपाठ इराणी चषकावरही नाव कोरल़े त्यांनी या सामन्यात शेष भारत संघावर २४६ धावांनी मात केली.  शतकवीर मनीष पांडेला सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आल़े
कर्नाटकने ६ बाद ३४१ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. मनीष पांडे व आर. विनयकुमार यांनी दुसरा डाव पुढे सुरू केला. त्यांनी सातव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली. विनयकुमारने ३८ धावा करीत पांडेला चांगली साथ दिली. ही जोडी फुटल्यानंतर कर्नाटकच्या डावाची घसरगुंडी झाली. एका बाजूने सुरेख खेळ करीत पांडे याने नाबाद १२३ धावा केल्या. त्यामध्ये त्याने १२ चौकार व तीन षटकार अशी टोलेबाजी केली. शेष भारत संघाकडून शार्दूल ठाकूर याने ८६ धावांत पाच बळी घेतले. पांडे याने केलेल्या शतकाच्या जोरावर कर्नाटकने ४२२ धावांपर्यंत मजल मारली व शेष भारतापुढे ४०३ धावांचे आव्हान ठेवले. केदार जाधवने केलेल्या आक्रमक अर्धशतकाचा अपवाद वगळता शेष भारताचा एकही फलंदाज आत्मविश्वासाने खेळू शकला नाही. ४३.३ षटकांत त्यांचा दुसरा डाव १५६ धावांवर कोसळला. कर्नाटकच्या श्रेयस गोपाळ या फिरकी गोलंदाजाने चार बळी घेत उल्लेखनीय कामगिरी केली. कर्नाटकच्या श्रेयस गोपाळ (४/३९) व अभिमन्यू मिथुन (३/४०) यांच्या अचूक गोलंदाजीपुढे शेष भारताची दाणादाण उडाली.

संक्षिप्त धावफलक
कर्नाटक :  २४४ व ४२२ (रवीकुमार समर्थ ८१, करुण नायर ८०, मनीष पांडे नाबाद १२३; शार्दूल ठाकूर ५/८६)
शेष भारत : २६४ व १५६ (केदार जाधव ५६ ; श्रेयस गोपाळ ४/३९)