पाटणा पायरेट्सच्या यशाच्या शिल्पकाराची प्रेरणादायी कहाणी

क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न कार्तिक सनसनवालने बालपणापासून जोपासले होते. दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूमचा भाग असावे, असे त्याला मनोमन वाटायचे. दुर्दैवाने तो क्रिकेटपटू होऊ शकला नाही. मात्र आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या सहयोगी चमूत तो सामील झाला. त्याच्या इच्छेला मार्ग मिळाला. काही वर्षांच्या यशस्वी सेवेनंतर तो तीन वर्षांपूर्वी प्रो कबड्डीकडे वळला आणि पाटणा पायरेट्स संघाचा व्यवस्थापक झाला. अनंत अडचणींवर मात करून प्रत्येक वर्षी उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या पाटण्याच्या यशात प्रेरणादायी व्यवस्थापक कार्तिकचा सिंहाचा वाटा आहे.

कार्तिकने १७ वर्षांखालील दिल्ली संघाचे राष्ट्रीय स्पध्रेत प्रतिनिधित्व केले होते. मात्र खेळाडू म्हणून आपले नाणे खणखणीत असल्याचे त्याला सिद्ध करता आले नाही. त्यामुळे व्यापार प्रशासनात त्याने पदवी घेतली आणि त्यानंतर पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मग नोकरीचा शोध चालू असताना एके दिवशी दिल्ली डेअरडेव्हिल्सने फेसबुकवर दिलेली एक जाहिरात त्याच्या निदर्शनास आली. समाजमाध्यमांवर त्यांच्या संघाचा प्रचार-प्रसार करण्याचे काम करायचे होते. छायाचित्रण, व्हिडीओ, ब्लॉग लिहिणे असे सारे त्यात अंतर्भूत होते. देशभरातून हजारो अर्ज दाखल झाले, पण खेळण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या कार्तिकची यासाठी निवड झाली. वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड वॉर्नर, मॉर्नी मॉर्केल यांसारख्या खेळाडूंना अतिशय जवळून त्याला अनुभवता आले. मग संघाच्या विपणनाची जबाबदारी त्याच्याकडे आली आणि पाहता-पाहता तो संघ व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग झाला. त्यानंतर दिल्ली संघाच्या मालकांच्या सल्ल्यामुळेच कार्तिककडे पाटणा पायरेट्स या प्रो कबड्डीतील संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली. मग तो कबड्डीत मनापासून रमला.

व्यवस्थापनाच्या जबाबदारीकडे कशा रीतीने पाहतोस, या प्रश्नाचे उत्तर देताना कार्तिक म्हणाला, ‘‘माझे पूर्वायुष्य कबड्डीशी निगडित मुळीच नाही, मात्र खेळाशी निगडित नक्कीच आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत बरीच वष्रे घालवल्यानंतर दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून बरेच काही शिकायला मिळाले. गॅरी कस्र्टन यांच्याकडून सांघिक भावना कशी दृढ करायची, याचा धडा घेतला. प्रो कबड्डीत तोच अनुभव खेळाडू आणि संघाच्या यशासाठी मी वापरतो.’’

तो पुढे म्हणाला, ‘‘संघनिवड, लिलाव या प्रत्येक वेळी एका व्यक्तीवर आम्ही विसंबून कधीच राहात नाही. सर्व जण एकत्रित चर्चा करून निर्णय घेतो. जे वैयक्तिक भल्याऐवजी संघाच्या भल्याचे असते, तेच महत्त्वाचे मानतो. त्यामुळे त्या निर्णयाने काही जण दुखावतातही, परंतु प्रदीर्घ काळाचा विचार केल्यास ते योग्य असते.’’

सांघिक भावना कशा प्रकारे संघात निर्माण केल्या आहेत, हे मांडताना कार्तिक म्हणाला, ‘‘संघासाठी विशिष्ट मूल्ये निर्माण केली आहेत. कोणत्याही खेळाडू किंवा प्रशिक्षकाला काही अडचणी, प्रश्न असतील, तर मोकळेपणाने चर्चा करा. एका कुटुंबाप्रमाणे राहा. खेळावरचे प्रेम टिकवून ठेवा आणि आनंद लुटून खेळा, हेच मी त्यांच्या मनावर बिंबवले आहे.’’चौथ्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात संघनिवड करताना कोणती काळजी घेतली, हे विशद करताना कार्तिक म्हणाला, ‘‘एक विजेता संघ विखुरला जाणार, याचे शल्य होते. लिलावातील नियमानुसार दोन कायम राहणाऱ्या खेळाडूंच्या जागांसाठी प्रदीप नरवाल आणि राजेश मोंडल या हुकमी चढाईपटूंना आम्ही संघात स्थान दिले. मग बचाव मजबूत करण्याचे धोरण आखत इराणचा फैझल अत्राचीला संघात घेण्यासाठी आम्ही ३८ लाख रुपये मोजले. याचप्रमाणे धर्मराज चेरलाथनला संघात घेतले.’’