‘‘शतकाच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिल्यापासून मोबाइल सतत वाजत आहे. मात्र, खेळाडूंसाठी असलेल्या शिष्टाचारानुसारच मी हे फोन घेत नाही. त्यामुळे मी आता हवेत आहे की काय, अशी शंका माझ्या चाहत्यांमध्ये निर्माणझाली आहे; पण माझे पाय जमिनीवरच आहेत,’’ असे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील भारताच्या विजयाचा शिल्पकार केदार जाधवने सांगितले.पहिला सामना झाल्यानंतर दोन्ही संघांचा गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सध्या सराव सुरू आहे. केदारने मंगळवारी येथे पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधला.

आपल्या शतकाचे श्रेय कर्णधार विराट कोहलीला देत तो म्हणाला, ‘‘विराट हा नेहमीच आपल्या जोडीदाराला मनापासून साहाय्य करण्याबाबत ख्यातनाम आहे. तो खेळत असताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे मुख्य लक्ष्य विराटला बाद करण्याचेच असते. मी जेव्हा फलंदाजीला आलो, तेव्हा विराटने हीच गोष्ट सांगितली व मला नेहमीच्या शैलीने खेळण्याचा सल्ला दिला. आपल्याला साडेतीनशे धावांचा पल्ला गाठायचा असून कोणताही धोका न पत्करता खेळ करण्याचेही त्याने सांगितले. त्याच्या या सल्ल्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला.’’

द्रुतगती गोलंदाजांवर आक्रमक फटकेबाजी कशी करू शकला, असे विचारले असता केदार म्हणाला, ‘‘लहानपणी आम्ही टेनिस चेंडूवर तीस यार्ड्स अंतराच्या मैदानात खेळायचो व फक्त षटकार मारण्याचीच स्पर्धा असे. हे तंत्रच मला येथे उपयोगी पडले. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर आत्मविश्वासाने तुटून पडायचे, हा कानमंत्रही विराटने दिला होता. त्याचाही मला फायदा झाला. पहिल्या सामन्यात मला संधी मिळेल याची खात्री होती. तेव्हाही या सरावावर भर दिला.’’

शतकापूर्वी केदारच्या पायात गोळे आले होते. त्या वेळी तुझी मानसिक स्थिती कशी होती, या प्रश्नावर तो म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियात दोन वर्षांपूर्वी भारत ‘अ’ संघाकडून खेळत असताना हाताला फ्रॅक्चर होते, तरीही मी खेळलो होतो. तेथील अनुभवाचाच पुण्यातील सामन्यात फायदा झाला. येथे शतकाच्या उंबरठय़ावर होतो हे लक्षात घेत मी पुढचाच चेंडू, तसेच त्यानंतरही प्रत्येक चेंडू सीमापार करण्याचे ठरविले होते. सुदैवाने माझ्या नियोजनात मी यशस्वी झालो.’’

आपल्या शतकात व आजपर्यंतच्या कारकीर्दीत आईवडील व अन्य कुटुंबीय तसेच माझे मित्र यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच मी आज क्रिकेटमध्ये उभा आहे. माझ्या अपयशाच्या काळातही त्यांनी वेळोवेळी दिलेला आधार खूप महत्त्वाचा ठरला आहे.

केदार जाधव, भारताचा फलंदाज