इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात निर्णायक शतक झळकावल्यानंतर केदार जाधव हे नाव भारतीय क्रिकेटविश्वात सर्वतोमुखी झाले आहे. भारतीय संघ बिकट अवस्थेत सापडला असताना केदारने कर्णधार विराट कोहलीला पुरेपूर साथ देत संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. या सामन्यातील कामगिरीबद्दल केदार जाधवला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. मात्र, या सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये गेलेल्या केदार जाधवसमोर एक वेगळीच अडचण उभी राहिली. मैदानावरून परतल्यानंतर अभिनंदनासाठी आलेल्या दुरध्वनींमुळे त्याचा फोन सातत्याने वाजत होता. अखेर एका क्षणाला केदारने त्याचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकला. मात्र, त्यानंतर केदारला आणखी एक चिंता सतावायला लागली. केदार आता मोठा खेळाडू झाल्याने तो फोन उचलत नाही, असा लोकांचा समज व्हायचा, असे केदारला वाटत आहे. मला खूप लोकांचे फोन येत आहेत. त्यामुळे मी माझा फोन सायलंट मोडवर ठेवला आहे. मात्र, त्यामुळे माझ्या जवळच्या मित्रांना केदारच्या डोक्यात मोठेपणाची हवा गेल्याचे वाटेल, याची भीती वाटत असल्याचे केदारने सांगितले. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. यावेळी केदारने म्हटले की, मी भूतकाळातील आठवणींमध्ये रमणारी व्यक्ती नाही. मला वर्तमानात जगायला आणि काम करायला आवडते. माझे पाय जमिनीवरच राहायला पाहिजेत, असे केदारने सांगितले.

भारतीय संघाचा पुढील एकदिवसीय सामना कटक येथे होणार असून त्यासाठी भारतीय संघ पुण्यात सराव करत आहे. कटकमध्ये सध्या लग्नाचा हंगाम असून त्याठिकाणच्या हॉटेल्सचे बुकिंग फुल आहे. त्यामुळे भारतीय संघाचा पुण्यातील मुक्काम लांबला आहे. भारतीय संघ उद्या कटकला रवाना होणार असून १९ तारखेला इंग्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यातदेखील केदार धावांची लयलूट करेल, अशी आशा भारतीय संघाला आहे. पुण्यातील सामन्यात केदारने विराट कोहलीला बहुमोल साथ दिली होती. मधल्या षटकांत कामचलाऊ गोलंदाज म्हणून उपयोग करता येईल या मानसिकतेने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळालेल्या केदार जाधव याने आपल्या धमा’केदार’ फलंदाजीची चुणूक दाखवून दिली. इंग्लंडने उभारलेल्या ३५१ धावांचा डोंगर गाठताना भारताची ४ बाद ६४ अशी अवस्था असताना केदारने कर्णधार कोहलीचा विश्वास सार्थ ठरवत पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर ऐतिहासिक खेळी साकारली. केदार जाधवने ७६ चेंडूत १२० धावांची खेळी साकारली. तर कर्णधार विराट कोहलीने १२२ धावा ठोकून कर्णधारी कामगिरी बजावली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल २०० धावांची भागीदारी रचून इंग्लंडच्या खिशात असलेला सामना खेचून आणला.