न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघात स्थान देण्यात आलेल्या केदार जाधव या फलंदाजाने गोलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. ३१ वर्षीय केदारचा संघात एक फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला होता. पण तो कामचलावू गोलंदाज असणे हे देखील त्याचे संघातील स्थान निश्चित होण्यामागचे एक कारण होते. आर.अश्विनसारखा मुख्य फिरकीपटू संघात नसताना धोनीने केदार जाधवकडून ऑफ स्पिन गोलंदाजी करवून घेतली आणि त्यास यश देखील आले. केदारने आतापर्यंतच्या चारही सामन्यात मोक्याच्या क्षणी विकेट्स घेऊन भारतीय संघासाठी दमदार कामगिरीची नोंद केली. केदारने याचे सारे श्रेय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला देऊ केले आहे. माझ्याकडून गोलंदाजी करवून घेण्याची कल्पना ही धोनीची होती. त्यास संघाचे प्रशिक्षक यांचाही पाठिंबा होता. संघातील पहिल्या पाच फलंदाजांमधील एक खेळाडूला गोलंदाजीही करता यावी, अशी अपेक्षा धोनीची होती. मुख्य गोलंदाजांना विकेट्स मिळत नसल्यास दुसरा पर्याय देखील असावा या उद्देशाने माझ्याकडे गोलंदाज म्हणून पाहिले गेले, असे केदार जाधव याने सांगितले.

फलंदाजीच्या बाबतीत केदार जाधवकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली नसली तरी गोलंदाजीमध्ये त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मागील सामन्यात माझ्याकडे फलंदाजी कौशल्य सिद्ध करण्याची उत्तम संधी होती. पण संधीचा योग्य फायदा मला घेता आला नाही. प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा उचलून चांगली कामगिरी करायला हवी. संघाला जेव्हा तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करायलाच हवी, हेच आंतरराष्ट्रीय सामन्यांतील विजयाचे सुत्र आहे, असेही केदार पुढे म्हणाला. केदार यावेळी विराट कोहलीच्या फलंदाजीचेही कौतुक केले. विराट प्रत्येकवेळी सर्वोत्तम कामगिरीसाठी झटत असतो. जेव्हा तो चांगली कामगिरी करतो तेव्हा सारेकाही आलबेल असते, पण केवळ विराटच्या फलंदाजीवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. संघात सर्वोत्तम फलंदाजांचा भरणा आहे आणि संधीचा योग्य उपयोग करायला हवा, असेही तो पुढे म्हणाला.