वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोचच्या भेदक गोलंदाजीपुढे बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शरण गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजने शिवनारायण चंदरपॉलच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर ३८० धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना रोचच्या तिखट माऱ्यापुढे बांगलादेशची दिवसअखेर ७ बाद १०४ अशी अवस्था आहे.
दिवसाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजला डॅरेन ब्राव्होच्या (४६) रूपात पहिला धक्का बसला. पण त्यानंतर चंदरपॉलने संघाला सावरत ८ चौकारांच्या जोरावर नाबाद ८४ धावांची खेळी साकारल्यामुळे वेस्ट इंडिजला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. चंदरपॉलला या वेळी जेरॉम टेलर (४०) आणि सुलेमान बेन (२५) यांनी चांगली साथ दिली.
बांगलादेशला सुरुवातीपासूनच एकामागून एक धक्के द्यायला सुरुवात केली. रोचने ३३ धावांत ५ बळी मिळवत बांगलादेशचे कंबरडे मोडले. टेलरने दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली. बांगलादेशकडून तमीम इक्बालने सर्वाधिक ४८ धावांची खेळी साकारली.