भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांचा सामना करणे आम्हाला आव्हानात्मक ठरेल, अशी कबुली न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने रविवारी दिली.

‘‘कुलदीप आणि चहल हे दोघेही गुणी गोलंदाज आहेत. आयपीएलमध्ये त्यांनी स्वत:ला सिद्ध केल्यानंतर आता भारताचे प्रतिनिधित्व करताना चांगले यश मिळवले आहे. त्यामुळेच त्यांच्या गोलंदाजीचा सामना करणे आम्हाला आव्हानात्मक ठरेल,’’ असे विल्यमसनने सांगितले.

‘‘मुळात ‘चायनामन’ गोलंदाज हे क्रिकेटमध्ये कमी घडतात. परंतु या गोलंदाजांनी उत्तम यश मिळवले आहे. कुलदीप आणि चहल हे दोघेही कौशल्यापूर्ण गोलंदाजी करतात. मात्र वातावरण आणि खेळपट्टीचा अचूक अंदाज घेऊन त्यानुसार गोलंदाजी करणे महत्त्वाचे असते,’’ असे विल्यमसन म्हणाला.

आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघातून अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे कुलदीप, चहल आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांच्यावर भारताच्या फिरकीची धुरा आहे. याबाबत विचारले असताना विल्यमसन म्हणाला, ‘‘भारताकडे अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. त्यामुळे अश्विन-जडेजा यांना कदाचित विश्रांती दिली असावी. क्रिकेटच्या हंगामात बरेचसे सामने खेळायचे असतात. त्यामुळे आम्हीसुद्धा खेळाडूंचे अशा प्रकारे व्यवस्थापन करतो. प्रत्येक खेळाडूला क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळणे आता शक्य नाही. कारण आता वर्षभर क्रिकेटची रेलचेल असते.’’

न्यूझीलंडच्या बऱ्याचशा फलंदाजांनी आयपीएलमध्ये कुलदीपच्या गोलंदाजीचा सामना केला आहे. यापैकी काही जण त्याच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाकडूनच खेळतात. त्यामुळे त्यांना कुलदीपच्या गोलंदाजीची चांगली माहिती आहे.    – माइक हेसन, न्यूझीलंडचे प्रशिक्षक