केरळ ब्लास्टर्स क्लबमधील इंग्लंडचा आघाडीपटू अँटोनिओ जर्मनने ८८व्या मिनिटाला गोल करून मुंबई सिटी एफसीसमोरील अडथळ्यांत भर घातली. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पध्रेतील (आयएसएल) आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या लढतीत ब्लास्टर्सने यजमानांना १-१ असे बरोबरीत रोखले. मुंबईकडून जुआन अ‍ॅगुएलेराने (२५ मि.) गोल केला. या निकालामुळे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहेत.
मुंबईला उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवावे लागणार असून इतर क्लबच्या जय-पराजयाच्या गणितावरही अवलंबून राहावे लागणार आहे. आयएसएल गुणतालिकेत तळाला असलेल्या मुंबई व केरळ यांच्यातील सामना नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगला. आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही क्लबकडून पुरेपूर प्रयत्न झाले. गोल करण्याच्या अनेक संधी दोघांनी निर्माण केल्या, परंतु गोलरक्षकांची अभेद्य भिंत आणि काही वेळा चुकीच्या खेळीमुळे त्यांना अपयश आले. घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणारा मुंबई प्रेक्षकांना विजयी निरोप देण्यात अपयशी ठरला. मुंबईचे १२ सामन्यांत १३ गुण, तर केरळचे १२ सामन्यांत १२ गुण झाले आहेत.