मॅच फिक्सिंग प्रकरणात अडचणीत आलेल्या एस श्रीशांतला सोमवारी केरळ हायकोर्टाने दिलासा दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घातलेली आजीवन बंदी हायकोर्टाने हटवली आहे. हायकोर्टाच्या निर्णयाचे श्रीशांतने स्वागत केले असून सर्व चाहत्यांचे त्याने आभारही मानले आहेत.

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणात वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतची गेल्या वर्षी दिल्लीतील न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त केले होते. या निकालानंतर श्रीशांतने बीसीसीआयकडे बंदी उठवण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसीआयने श्रीशांतवरील बंदी उठवण्यास नकार दिला होता. शेवटी श्रीशांतने केरळमधील हायकोर्टाचे दार ठोठावले होते.

सोमवारी केरळ हायकोर्टाने श्रीशांतच्या याचिकेवर निर्णय दिला. ‘श्रीशांतला दोषमुक्त केले आहे, मग त्याच्यावरील बंदी का उठवत नाही?’ असा सवालच हायकोर्टाने बीसीसीआयला विचारला. यानंतर हायकोर्टाने श्रीशांतवरील बंदी उठवण्याचे आदेश दिले. ‘बीसीसीआयकडून मला त्रास दिला जात असून यामुळे माझे करिअर धोक्यात आले आहे’ असे श्रीशांतने हायकोर्टात सांगितले. हायकोर्टाच्या निकालाचे श्रीशांतने स्वागत केले. ‘माझ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. मी लवकरच मैदानात परतेन’ असे श्रीशांतने सांगितले. मे २०१३ मध्ये दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगप्रकरणात श्रीशांतसह राजस्थान रॉयल्सच्या अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांनादेखील अटक केली होती.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष टीसी मॅथ्यू यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. श्रीशांतविरोधात बीसीसीआयने सुप्रीम कोर्टात जाऊ नये, पण हे माझे वैयक्तिक मत आहे असे त्यांनी सांगितले. बीसीसआयने हायकोर्टात बाजू मांडताना सांगितले की, श्रीशांतवरील बंदीचा निर्णय तत्कालीन प्रशासकीय समितीने घेतला होता. या निर्णयात आम्ही बदल करु शकत नाही असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.