राष्ट्रीय किशोर-किशोरी स्पर्धेत प्रथमच वापर; मुलींसाठी उपयुक्त सुरक्षाकवच

खो-खोमध्ये सूर मारताना खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: मुलींना अधिक त्रास होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा संघटनेने जलतरणपटूंच्या पोशाखाप्रमाणे दिसणारे कापडी सुरक्षा आवरण तयार केले आहे. २४ ते २८ मे या कालावधीत आयोजित १४ वर्षांखालील २८ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत त्याचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी येथे आयोजित आमंत्रितांच्या स्पर्धेत काही महिला खेळाडूंनी त्याचा वापर केला होता. या वापरानंतर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्याली व आता राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच अशा प्रकारे महिला खेळाडूंची काळजी घेण्यात येणार आहे.

येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होणारी ही किशोर-किशोरी गटाची राष्ट्रीय स्पर्धा खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वैशिष्टय़पूर्ण ठरत आहे. उन्हापासून खेळाडूंच्या संरक्षणासाठी मैदानावर खास तंबूची व्यवस्था करण्यात आली असून अशा प्रकारे तंबूत होणारी ही खो-खोची पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा ठरली आहे. त्यात आता सुरक्षित कापडी आवरणाची भर पडणार आहे. कबड्डीप्रमाणेच खो-खो हा रांगडा मैदानी खेळ असल्याने यात खेळाडूंना दुखापत होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यातही सूर मारताना मुलांपेक्षा मुलींना होणाऱ्या दुखापती भविष्यात त्यांना अधिकच त्रासदायक ठरू शकतात.

जिल्हा संघटनेच्या प्रशिक्षक गीतांजली सावळे तसेच कैलास ठाकरे, अंतू जोशी यांना मुलींना होणाऱ्या या दुखापतींचा भविष्यातील धोका लक्षात आल्यावर त्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल, याविषयी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि  पोशाखाच्या आतून वापरता येण्याजोगा कापडी आवरणाचा उपाय पुढे आला. जलतरणपटूंच्या पोशाखासारखाच हा पोशाख असून त्यात स्पंजचा वापर करण्यात आला आहे. मुलींनी सूर मारला तरी फोममुळे छाती, ओटीपोट आणि गुडघ्यापर्यंतच्या भागास बसणाऱ्या दणक्याचे प्रमाण या आवरणामुळे कमी झाले. शिवाय या आवरणाचे वजन केवळ ५० ग्रॅम असल्याने त्याचा कोणताच भार मुलींना जाणवत नाही.

हे आवरण तयार झाल्यानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये नागपूर येथे आयोजित ५० व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेप्रसंगी कोल्हापूरच्या काही मुलींनी प्रथम त्याचा वापर केला. त्या वेळी या आवरणाला बाह्य़ाही करण्यात आल्या होत्या. मुलींनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन ते आवरण बिनबाह्यचे करण्यात आले. जिल्हा संघटनेतर्फे डिसेंबर २०१६ मध्ये आयोजित निमंत्रितांच्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत या आवरणासह महिला खेळाडू खेळल्या. या आवरणामुळे फायदा झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्यावर जिल्हा संघटनेचा विश्वास अधिकच दुणावला. अलीकडेच खो-खोप्रेमी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या पोशाखाची पाहणी करून हा अतिशय स्तुत्य प्रयोग असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळेच आता  किशोर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याचा वापर करण्यात येणार असून प्रत्येक संघातील सूर मारणाऱ्या तीन ते चार मुलींना हा पोशाख देण्यात येणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख यांनी दिली.

स्पध्रेसाठी निवडण्यात आलेले महाराष्ट्राचे संघ

किशोर : शुभम थोरात (कर्णधार), साहिल चिखले, शुभम खळदकर (सर्व पुणे), सौरभ अहिर, नागेश चोरलेकर, गणेश जाधव (सर्व सांगली), धीरज भावे (मुंबई उपनगर), नरेंद्र कातकडे (अहमदनगर), चंदू चावरे (नाशिक), मनोज चौधरी (औरंगाबाद), आदित्य धिमधिमे (उस्मानाबाद), रामजी कश्यप (सोलापूर); किशोरी संघ : साक्षी करे (कर्णधार), ऋतिका राठोड, साक्षी वसावे (सर्व पुणे), ऋतुजा सुराडकर, मयूरी पवार (सर्व औरंगाबाद), रितिका मगदूम (सांगली), वैभवी गायकवाड, गौरी िशदे (सर्व उस्मानाबाद), साक्षी वाफेलकर (मुंबई उपनगर), साक्षी सरजीने (ठाणे), वैष्णवी पालवे (अहमदनगर), अश्विनी निशाद (पालघर).