भारताची राष्ट्रीय विक्रम नोंदवणारी खेळाडू खुशबीर कौरला जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत ३७वे स्थान मिळाले. तिची सहकारी सपना कुमारीला या शर्यतीतून तांत्रिक कारणास्तव बाद करण्यात आले.
रिओ ऑलिम्पिकचे तिकीट यापूर्वीच निश्चित करणाऱ्या खुशबीरने ही शर्यत एक तास, ३८ मिनिटे, ५३ सेकंदांत पूर्ण केली. तिच्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा तिला येथे ७ मिनिटे जास्त वेळ लागला. या शर्यतीत तिने एक तास, ३१ मिनिटे, ४० सेकंद असा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. तिने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. मॉस्को येथे झालेल्या मागील जागतिक स्पर्धेत तिला ३९वे स्थान मिळाले होते.
विकास गौडा आजनशीब अजमावणार
थाळीफेकीतील आशियाई विजेता विकास गौडाच्या कामगिरीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याने अंतिम फेरीत स्थान मिळवले असून ही फेरी शनिवारी होणार आहे. ५० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार व मनीषसिंग रावत हेदेखील शनिवारी आपले नशीब अजमावणार आहेत. याच दिवशी होणाऱ्या महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारतीय संघ सहभागी झाला आहे. महिलांची मॅरेथॉन शर्यत रविवारी होणार असून त्यामध्ये ललिता बाबर, ओ. पी. जैशा व सुधा सिंग सहभागी होणार आहेत.