भारताचा युवा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत भारताच्याच साई प्रणीतला पराभूत करून उपांत्यफेरीत दिमाखात प्रवेश केला. किदम्बी आणि प्रणीतमध्ये ४५ मिनिटे सामना रंगला. त्यात श्रीकांतनं प्रणीतचा २५-२३, २१-१७ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

पहिला सेट गमावलेल्या प्रणीतनं दुसऱ्या सेटमध्ये जबरदस्त वापसी केली. ६-९ असा गुणफरक असताना प्रणीतने सलग तीन गुण मिळवून सेट ९-९ असा बरोबरीत आणला होता. मात्र त्यानंतर ब्रेक पॉईंटमध्ये ११-९ अशी आगेकूच करत श्रीकांतने पुन्हा आघाडी घेतली. श्रीकांतनं १०-१२ अशी आघाडी घेतली असताना प्रणीतनं पुन्हा १६-१६ अशी बरोबरी साधली. अखेर श्रीकांतने दमदार कामगिरीच्या जोरावर साई प्रणीतचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आणला आणि उपांत्यफेरी गाठली. उपांत्यपूर्व सामन्यातील पहिल्या सेटमध्ये दोन्ही भारतीयांनी दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. मात्र गेम पॉईंटमध्ये रंगलेला पहिला सेट श्रीकांतने २५-२३ असा खिशात घातला. पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये आत्मविश्वास दुणावलेल्या श्रीकांतने २१-१७ अशी खेळी करत सामन्यात बाजी मारली. आता उपांत्यफेरीत श्रीकांतचा सामना चीनच्या शी युकी आणि डेन्मार्कच्या हान्स क्रिश्चियन विटिंगहस यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.