सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदाची पुनरावृत्ती करण्याचा श्रीकांतचा प्रयत्न अपुरा ठरला. हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनच्या अव्वल मानांकित चेन लाँगने श्रीकांतला नमवले. श्रीकांतच्या पराभवासह भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
चीन सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदासह श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान मिळवले होते. एक तास चाललेल्या लढतीत चेनने श्रीकांतवर २१-१७, १९-२१, २१-६ असा विजय मिळवला. ऑगस्ट महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चेननेच श्रीकांतला पराभूत केले होते.
पहिल्या गेममध्ये चेनने १०-३ अशी भक्कम आघाडी घेतली. श्रीकांतला पिछाडी भरून काढण्यातच दमछाक झाली. त्याने मुकाबला १६-१७ अशा स्थितीत आणला. नेटजवळ अचूक खेळ करण्यात अपयश आल्याने चेनने बाजी मारली.
दुसऱ्या गेममध्ये चेनने ४-० अशी आघाडी घेतली. श्रीकांतने स्मॅश आणि क्रॉसकोर्टच्या दमदार फटक्यांच्या जोरावर ८-८ अशी बरोबरी केली. मात्र यानंतर चेनने नेटजवळून अफलातून खेळ करत ११-१० अशी निसटती आघाडी मिळवली. श्रीकांतने आक्रमक पवित्रा घेत १४-११ अशी आगेकूच केली. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी दडपणाखाली असलेल्या श्रीकांतने चतुराईने खेळ करत १७-१३ अशी आघाडी घेतली. चेनने झुंजार खेळ करत १८-१६ अशा स्थितीत मुकाबला आणला. मात्र यानंतर स्वैर फटक्यांमुळे श्रीकांतने २०-१९ अशी महत्त्वपूर्ण बढत मिळवली. चेनच्या खराब फटक्याच्या आधारे श्रीकांतने दुसरा गेम जिंकत बरोबरी केली.
तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये चेनने ताकदवान स्मॅशच्या फटक्यांद्वारे श्रीकांतला निरुत्तर केले. चेनने ११-४ अशी भक्कम आघाडी घेतली. चेनने नेटजवळून सुरेख खेळ करत आघाडी वाढवली. श्रीकांतच्या हातून झालेल्या चुकांचा फायदा उठवत चेनने तिसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.