इंडियन प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात लायन्स संघाला रविवारी तळाला असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना करावा लागणार आहे. या लढतीत विजय मिळवून आपले स्थान अधिक पक्के करण्याची संधी गुजरातसमोर आहे, तर आव्हान टिकवण्यासाठी पंजाब प्रयत्नशील असेल.
गुजरातने ७ सामन्यांत सहा विजय मिळवून १२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे, तर पंजाबच्या खात्यात सहा सामन्यांत केवळ दोनच गुण जमा आहेत. त्यामुळे हा सामना एकतर्फी होईल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. शुक्रवारी महेंद्रसिंग धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे १९५ धावांचे लक्ष्य पार केल्यामुळे गुजरातचा आत्मविश्वास अजून वाढला आहे.
ब्रेंडन मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथ हे सलामीवीर लायन्सच्या विजयाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या अफलातून खेळाच्या जोरावर गुजरात मोठे लक्ष्य सहज पार करू शकतो. मात्र, रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो या अष्टपैलू खेळाडूंना अजूनही साजेशे योगदान देता आलेले नाही, तर कर्णधार सुरेश रैनावर मधल्या फळीची जबाबदारी आहे. गोलंदाज प्रवीण कुमार आणि धवल कुलकर्णी यांची कामगिरी समाधानकारक झालेली आहे.
दुसरीकडे डेव्हिड मिलर व ग्लेन मॅक्सवेल ही मोठी नावे असूनही पंजाबला सातत्याने अपयशाचे तोंड पाहावे लागत आहे. मुरली विजय आणि मनन वोरा यांची कामगिरी उल्लेखनीय असली तरी संघाच्या विजयासाठी ती पुरेशी नाही. मधल्या फळीत शॉन मार्श सातत्यपूर्ण खेळ करत आहे.
पंजाबच्या कर्णधारपदी मुरली विजय
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या कर्णधारपदावरून डेव्हिड मिलरची गच्छंती करण्यात आली असून त्याच्या जागी सलामीवीर मुरली विजयला संधी देण्यात आली आहे. रविवारी गुजरातविरुद्धच्या लढतीपासून विजय संघाचे नेतृत्व संभाळणार आहे. मिलरला फलंदाजीत लक्ष केंद्रित करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सामन्याची वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून. थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स