आज सनरायझर्स हैदराबादशी सामना

किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आयपीएलमध्ये यंदासुद्धा झगडतो आहे. त्यामुळे गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान पेलून कात टाकण्याचे अवघड आव्हान शुक्रवारी त्यांच्यासमोर असेल.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादने आठ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले आहेत, तर पावसामुळे बेंगळुरूविरुद्धचा सामना रद्द झाला आहे. त्यामुळे ९ गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. त्या तुलनेत पंजाबला सात सामन्यांत फक्त तीनच विजय मिळवता आले आहेत. पंजाबचा मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागने पुढील सर्वच सामने संघासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील, असा इशारा दिला आहे. घरच्या मैदानावर पंजाबचा संघ ९ मेपर्यंतच्या कालखंडात कोलकाता नाइट रायडर्स संघासह चार सामने खेळणार आहे.

यंदा हैदराबादने घरच्या मैदानावर १५९ ही धावसंख्या उभारून पंजाबला फक्त ५ धावांनी हरवले होते. मनन व्होराने ५० चेंडूंत ९५ धावांची शानदार खेळी साकारली, परंतु ती पंजाबला तारण्यात अपयशी ठरली, कारण बाकीच्या फलंदाजांकडून त्याला पुरेशी साथ मिळू शकली नाही. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने टिच्चून गोलंदाजी करताना ४-०-१९-५ अशी कामगिरी केली.

सलामीवीर हशिम अमलाचा फॉर्म, ही पंजाबच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट आहे. पंजाबने मुंबई इंडियन्सविरुद्ध १९८ धावा उभारल्या होत्या. अमलाने त्या सामन्यात वादळी शतक साकारले होते, तर कर्णधार ग्लेन मॅक्सवेलनेही चौफेर फटकेबाजी केली होती. पंजाबने मागील सामन्यात गुजरात लायन्सला २६ धावांनी पराभूत केले आहे. यात अमलाची खेळी महत्त्वाची ठरली होती.

दुसरीकडे हैदराबादचा संघ सातत्य टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (७ सामन्यांत २३५ धावा) आणि शिखर धवन (७ सामन्यांत २८२ धावा) यांनी सातत्याने धावा केल्या आहेत. मोझेस हेन्रिक्सचेही (एकूण १९३ धावा) मोलाचे योगदान संघाच्या यशात आहे. पुण्याविरुद्ध त्याने २८ चेंडूंत नाबाद ५५ धावा केल्या होत्या. केन विल्यम्सन दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळला होता. त्याने ५१ चेंडूंत ८९ धावा काढत संघाला विजय मिळवून दिला. युवराज सिंग आणि सिद्धार्थ कौलला घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव मिळेल.

गोलंदाजीत भुवनेश्वर (एकूण १६ बळी) आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान (एकूण १० बळी) यांच्यावर हैदराबादची भिस्त आहे.