त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओव्हल आणि दरबानमधील किंग्समीड ही मैदाने निकृष्ट दर्जाची आहेत, असा कडक शेरा या दोन्ही ठिकाणी लढत झालेल्या सामनाधिकाऱ्यांनी दिला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा कसोटी सामना क्वीन्स पार्क ओव्हल मैदानात खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या पहिल्या दिवशी फक्त २२ षटकांचा खेळ होऊ शकला. त्यानंतर पावसाने काही काळ हजेरी लावली, पण पाऊस गेल्यावर कर्मचाऱ्यांना मैदान खेळासाठी उपलब्ध करून देता आले नाही. त्यामुळेच हा सामना बरोबरीत सोडावा लागला आणि कसोटी क्रमवारीत भारताची अव्वल स्थानावर जाण्याची संधी हुकली. या लढतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियुक्त केलेले सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी मैदानाबाबत नाराजी प्रकट केली.

किंग्समीड येथे यजमान दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. मैदानातील कर्मचाऱ्यांच्या कुचकामीपणामुळे हा सामनाही अनिर्णित घोषित केला. त्यानंतर सामनाधिकारी अ‍ॅण्डी पायक्रॉफ्ट यांनी नाराजी दर्शवली. ‘याबाबतचे अहवाल आम्ही दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळांना पाठवला आहे. या अहवालावर या दोन्ही मंडळांकडून १४ दिवसांमध्ये उत्तर अपेक्षित आहे,’ असे आयसीसीने पत्रकात म्हटले आहे.