ऑलिम्पिकमध्ये अपेक्षेइतकी कामगिरी मला करता आली नाही. मात्र त्यामुळे निराश न होता मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणार आहे, असे अव्वल दर्जाचा बॉक्सर विकास कृष्णन याने सांगितले.

विकास याने २०११ मध्ये जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. त्याला रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीतच पराभव स्वीकारावा लागला होता. त्याने ७५ किलो गटात प्रतिनिधित्व केले होते.

ऑलिम्पिकमधील कामगिरीविषयी विकास म्हणाला, माझ्यासाठी ती खूप चांगली स्पर्धा होती. मला प्रत्येक फेरीत बलाढय़ खेळाडूंशी झुंज द्यावी लागली. जरी मला पदक मिळविता आले नाही, तरी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठणे ही देखील समाधानकारक कामगिरी आहे. उपांत्यपूर्व फेरीत मी अपेक्षेइतका आक्रमक खेळ करू शकलो नाही. माझा प्रतिस्पर्धी बेक्तेमीर मेलिकुझियेव याने खूपच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याला तुल्यबळ मी बचाव करू शकलो नाही.

देशात राष्ट्रीय संघटनाच अस्तित्वात नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक झाली काय असे विचारले असता विकास म्हणाला, ऑलिम्पिकमधील पराभवाचे खापर मी कोणावरही टाकणार नाही. मात्र लवकरात लवकर राष्ट्रीय संघटना स्थापन करण्याची आवश्यकता आहे. परदेशातील स्पर्धामध्ये भाग घेण्याची अधिकाधिक संधी मिळाल्यास आमच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा होईल.

जागतिक स्पर्धा जर्मनीत होणार आहे मात्र त्याची कार्यक्रमपत्रिका अद्याप निश्चित झालेली नाही. विकास याने या स्पर्धेत पदक मिळविल्यास जागतिक स्पर्धेत दोन वेळा पदक मिळविणारा तो पहिला भारतीय खेळाडू होईल.