भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पहिल्या द्विशतकावर मुलतानचा सुलतान विरेंद्र सेहवागने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघातून निवृत्ती घेतल्यानंतर सेहवाग सध्या सोशल माध्यमात बराच सक्रिय असतो. पाकिस्तानच्या खेळाडूंची थट्टा करणाऱ्या विरुने विराट कोहलीचे कौतुक केले आहे. सध्या सर्व ठिकाणी ‘ली’ ची लोकप्रियता असल्याचे सेहवागने आपल्या ट्विटने निदर्शनास आणून दिले आहे. विरेंद्र सेहवागने भारतीय कसोटी कर्णधार कोहलीची त्याने कबालीशी तुलना केली आहे.  बॉलीवूडमध्ये सध्या रजनिकांतच्या ‘कबाली’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे कोहलीने कॅरेबियन मैदानावर सैराट खेळी केल्यामुळे सर्वत्र ‘ली’ ची लोकप्रियता दिसत असल्याचे सेहवागने म्हटले आहे. भारतीय संघाचा आक्रमक फंलदाजी करताना सेहवागने भारतासाठी १०४ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये सेहवागने  २३ शतके आणि ६ द्विशतके ठोकली आहेत.कसोटी सामन्यात त्रिशतकी खेळी करणारा सेहवाग  सेहवाग एकमेव भारतीय आहे. कोहलीने पहिल्या कसोटीमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले.  विराट कोहली आणि अश्विन यांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये भारताने धावांचा डोंगर उभारला असून भारताने उभारलेल्या ५६६ धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजने आपला पहिला गडी गमावला आहे.