भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीला सिएट पुरस्कार सोहळ्यात ‘सवरेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०११-१२ हंगामात सर्वोत्तम प्रदर्शनासाठी हा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तान संघाला सवरेत्कृष्ट संघाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क, श्रीलंकेचा भरवशाचा फलंदाज कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा हशीम अमला शर्यतीत होते. मात्र कोहलीने या सर्वावर मात करत पुरस्कारावर नाव कोरले. कोहली या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. त्याच्या वतीने पाकिस्तानचा महान गोलंदाज वासिम अक्रमने हा पुरस्कार स्वीकारला. पाकिस्तानचे महान फलंदाज झहीर अब्बास यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष भारत-पाकिस्तान पुरस्कार गटात सुनील गावस्कर यांची सवरेत्कृष्ट कसोटी फलंदाज तर इंझमाम उल हकची सवरेत्कृष्ट एकदिवसीय फलंदाज म्हणून निवड झाली. कपिल देव सर्वोत्तम कसोटी गोलंदाज तर वासिम अक्रम सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाज ठरला.
प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वर आणि भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांना संयुक्तपणे देण्यात आला. पहिलावहिला सीएट सर्वोत्तम युवा भारतीय क्रिकेटपटूचा मान १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चांदने पटकावला.