कोल्हापूरने पाच सुवर्णासह एकूण १६ पदकांची कमाई करत जिल्हा नेमबाजी क्रीडा संघटना आणि महाराष्ट्र रायफल संघटना यांच्या वतीने येथे आयोजित महाराष्ट्र एअर वेपन नेमबाजी स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यजमान नाशिकने चार सुवर्णासह आठ, तर पुण्याने सहा रौप्यसह नऊ पदके मिळवली. मुंबईने तीन सुवर्णाची कमाई केली. एअर रायफल (एनआर) वरिष्ठ व कनिष्ठ गटात मुंबईचा ओमकार घोडके, नाशिकची श्वेता शिंपी, युवा गटात औरंगाबादचा सिद्धेश्वर जाधव, मुलींमध्ये नाशिकची श्वेता शिंपी, ओपन साईट एअर रायफल प्रकारात नाशिकची चंदन सोनी यांनी सुवर्ण मिळविले. एअर रायफल (आयएसएसएफ) प्रकारात मुली व कनिष्ठ गटात कोल्हापूरची वैष्णवी पडाळकर, युवा गटात मुंबईची ऋतुजा महेंद्रकरने सुवर्ण, तर याच गटासह मुले व कनिष्ठ गटात कोल्हापूरच्या शाहू मानेने सुवर्ण मिळवित हॅटट्रीक केली.

 

स्पेनची भारतावर मात

माद्रिद: रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून आयोजित दौऱ्यात भारतीय हॉकी संघाला स्पेनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानी असलेल्या स्पेनने क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारतीय संघाला ३-२ असे नमवत धक्का दिला. या पराभवासह स्पेनने दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.

मनप्रीत सिंग (३८) आणि रमणदीप (५७) यांनी भारतातर्फे गोल केले. स्पेनकडून जोसेप रोमेयू (२०), पौयू क्यूमाडा (४२) आणि साल्व्हाडोर पिअरा (५३) यांनी गोल केले.

 

नाशिकमध्ये राज्य कबड्डी पंच शिबीर

नाशिक : जिल्हा कबड्डी संघटना आणि क्रीडा प्रबोधिनी यांच्या वतीने येथील विभागीय क्रीडा संकुलात ३० व ३१ जुलै रोजी राज्य कबड्डी पंच शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबीराचे उद्घाटन शनिवारी दुपारी ४.३० वाजता राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ता पाथरीकर, प्रमुख कार्यवाह आस्वाद पाटील, सहसचिव प्रकाश बोराडे, प्रा. सुनील जाधव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य मोहन भावसार, क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष जयंत जाधव, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड व क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. राज्य कबड्डी पंच शिबीरासाठी महाराष्ट्रातून १५० पंच उपस्थित राहणार असून त्यांना डॉ. शैलेश शेलार हे ‘पंचांची तंदुरूस्ती व शारीरिक क्षमता’, माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अनुराधा डोणगावकर ‘पंचांचे मानसिक संतुलन’, योगाचार्य गोकुळ घुगे ‘योगाचे पंच आणि खेळाडूंसाठी महत्व’, महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष मनोहर इंदुलकर व सचिव राऊत ‘कबड्डीतील नवनवीन बदल-नियम व पंचांची कामगिरी’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. ३१ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता शिबीराचा समारोप होणार आहे.