बंगळुरू एफसीविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून पहिल्यांदा आय लीग जेतेपदावर कब्जा करणाऱ्या मोहन बागानचे सोमवारी कोलकाता शहरात आगमन झाले. फुटबॉल प्राण असणाऱ्या कोलकाता वासियांनी मोहन बागानच्या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळावर मोहन बागान संघाचे आगमन होताच फटाके आणि घोषणाबाजीला उधाण आले. यानंतर संघाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अफाट जनसागर उपस्थित होता. इंडियन सुपर लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या अ‍ॅटलेटिको डि कोलकाता संघाचेही असेच स्वागत करण्यात आले होते. ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि बंगालच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या मोहन बागानच्या खेळाडूंना चाहत्यांनी अभिवादन केले. मोहन बागान संघाला पाच वर्षांनंतर महत्त्वाचे विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे प्रशिक्षक संजय सेन यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बागान संघाने आयलीग फुटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. 

आशियाई फुटबॉल महासंघाचे ‘अ’ श्रेणी प्रमाणपत्र नसल्यामुळे सुभाष भौमिक यांना बागानचे प्रशिक्षकपद सोडावे लागले होते. त्यामुळे प्रशिक्षकपदाची धुरा सेन यांच्याकडे देण्यात आली. बागानसाठी हा बदल खूपच फायदेशीर ठरला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बागान संघाने आयलीग स्पर्धेत प्रभावी कामगिरी करीत अव्वल स्थान मिळविले.
ज्येष्ठ प्रशिक्षक पी. के. बॅनर्जी यांनी सेन यांचे कौतुक करीत सांगितले की, ‘‘सेन यांनी अतिशय कुशलतेने खेळाडूंच्या व्यूहरचना करीत त्यांच्याकडून अपेक्षित यश साध्य केले. संघात विविध भाषिक व परदेशी खेळाडूंचा समावेश असला की त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणे ही खूप कठीण कामगिरी असते, मात्र सेन यांनी हे आव्हान स्वीकारले व बागान संघाच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपविला. हा विजय केवळ बागान संघासाठी नव्हे तर कोलकाता शहराकरिता सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे. बागान संघाने तेरा वर्षांपूर्वी लीग स्पर्धा जिंकली होती. ईस्ट बंगाल संघासही २००४ नंतर विजेतेपद मिळाले नव्हते.
‘सेन यांनी केलेली कामगिरी लक्षात घेऊन अन्य भारतीय संघटकांनी त्यांच्या मार्गानेच वाटचाल केली पाहिजे. भारतीय प्रशिक्षकदेखील आयलीगसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एका क्लबला विजेतेपद मिळवून देऊ शकतो. परदेशी प्रशिक्षकाचा हट्ट सोडण्याची वेळ आली आहे’, असे भारताचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू सुब्रता भट्टाचार्य यांनी सांगितले.