कोलकाता नाइट रायडर्सची आयपीएलच्या दहाव्या हंगामात झंझावाती वाटचाल सुरू आहे. ईडन गार्डन्सच्या घरच्या मैदानावर असो, किंवा प्रतिस्पध्र्याच्या कोलकाताचे वर्चस्व मोडणे हे अन्य संघांना आव्हानात्मक ठरत आहे. शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या लढतीत म्हणूनच त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

कोलकाताच्या खात्यावर आठ सामन्यांत १२ गुण जमा आहेत. याशिवाय त्यांची निव्वळ धावगतीसुद्धा +१.१५३ अशी सरस आहे. त्यामुळे कोलकाताला बाद फेरीसाठी फार चिंता बाळगायची आवश्यकता नाही. मात्र सहा सामन्यांत ४ गुण कमवू शकणाऱ्या आणि गुणतालिकेत सातव्या स्थानावर असणाऱ्या दिल्लीला मात्र आतापासूनच सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे.

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाताचा संघ मैदानावर दिमाखदार कामगिरी करीत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुसारख्या स्पध्रेतील अव्वल संघाला फक्त ४९ धावांत गुंडाळल्यानंतर कोलकाताने बुधवारी रात्री रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला होता.

सलग तीन पराभवांनंतर पाच दिवसांची विश्रांती घेत दिल्लीचा संघ झहीर खानच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विजयी घोडदौडीसाठी उत्सुक आहे.

कोलकाताची प्रमुख मदार आहे ती त्रिनिदादचा आक्रमक फलंदाज सुनील नरिनवर. दुखापतग्रस्त ख्रिस लिनची जागा नरिनने अनपेक्षितपणे भरून गाढली आहे. बेंगळूरुविरुद्ध नरिनने १७ चेंडूंत ३४ धावा केल्या होत्या. पुण्याविरुद्धच्या सामन्यात नरिनने ११ चेंडूंत १६ धावा केल्या आणि तो धावचीत झाला. मात्र गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी संघाला आरामात विजय मिळवून दिला.