गुजरात लायन्सविरुद्ध आज सामना

विजयाची हॅट्ट्रिक नोंदवत कोलकाता नाइट रायडर्सचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे शुक्रवारी गुजरात लायन्सविरुद्ध दोन हात करताना अव्वल स्थान अबाधित राखण्याबरोबर विजयी चौकार फटकावण्यासाठी कोलकात्याचा संघ सज्ज असेल. दुसरीकडे गुजरातच्या संघाला आतापर्यंत पाच सामन्यांपैकी एकच सामना जिंकता आला असून ते गुणतालिकेत तळाला आहेत. त्यामुळे कोलकात्यावर विजय मिळवून विजयाच्या वाटेवर परतण्यासाठी गुजरातचा संघ उत्सुक असेल.

आतापर्यंतच्या प्रवासात कोलकात्याच्या काही खेळाडूंनी विजयात हातभार लावला आहे; पण तरीही काही खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळालेले नाही. कर्णधार गौतम गंभीर चांगल्या फॉर्मात आहेच, पण गेल्या सामन्यात युसूफ पठाण आणि मनीष पांडे यांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता. सूर्यकुमार यादवला फलंदाजीत अजूनही आपली छाप पाडता आलेली नाही. फिरकी गोलंदाजीमध्ये सुनील नरिन, कुलदीप यादव आणि पठाण यांनी सातत्यपूर्ण मारा केला आहे.

गुजरातच्या संघाचा विचार केला तर रवींद्र जडेजा, ड्वेन स्मिथ आणि आरोन फिंच यांनी आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम हा चांगल्या फॉर्मात आला आहे, तर कर्णधार सुरेश रैनाला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. केरळचा युवा वेगवान गोलंदज बसिल थम्पीने आतापर्यंत भेदक मारा करत संधीचे सोने केले आहे.

गेल्या हंगामातील दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातने कोलकात्यावर विजय मिळवला होता; पण यंदाच्या हंगामाचा विचार केला तर कोलकात्याच्या संघाचे पारडे गुजरातपेक्षा जड वाटत आहे. त्यामुळे या सामन्यात गेल्या हंगामातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी कोलकात्याकडे असेल.

संभाव्य संघ

  • कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), पीयूष चावला, ऋषी धवन, सयान घोष, शेल्डन जॅक्सन, इशांक जग्गी, कुलदीप यादव, मनीष पांडे, युसूफ पठाण, सूर्यकुमार यादव, अंकित राजपूत, संजय यादव, रॉबिन उथप्पा, उमेश यादव, ख्रिस वोक्स, शकीब अल हसन, रोव्हमन पॉवेल, ख्रिस लिन, सुनील नरिन, नॅथन कल्टर-नील, ट्रेंट बोल्ट.
  • गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), अक्षदीप नाथ, शुभम अगरवाल, बसिल थम्पी, चिराग सुरी, मनप्रीत गोणी, इशन किशन, रवींद्र जडेजा, शदाब जकाती, दिनेश कार्तिक, शिविल कौशिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, मुनाफ पटेल, प्रथम सिंग, सुरेश रैना, प्रदीप संगवान, जयदेव शाह, शेली शौर्य, नथ्थू सिंग, तेजस बरोका, अँड्रय़ू टाय, ड्वेन ब्राव्हो, जेम्स फॉकनर, आरोन फिंच, ब्रेंडन मॅक्क्युलम, जेसन रॉय, ड्वेन स्मिथ.