ईडन गार्डन्सच्या घरच्या मैदानावर गुजरात लायन्सकडून पत्करलेल्या पराभवामुळे कोलकाता नाइट रायडर्स संघाला खडबडून जाग येण्याची आवश्यकता आहे. आयपीएलमध्ये रविवारी होणाऱ्या सामन्यात दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा सामना करणे कोलकाताच्या गोलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

ईडन गार्डन्सच्या फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर सूर गवसलेला ख्रिस गेल आणि स्फोटक फलंदाज विराट कोहली धावांचा पाऊस पाडू शकतील. त्यामुळेच कोलकाताच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढली आहे.

कोलकाताने आयपीएलच्या दहाव्या हंगामाची सुरुवात झोकात सुरुवात करताना पाचपैकी चार सामने जिंकण्याची किमया साधली. परंतु सुरेश रैनाच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे कोलकाताला शुक्रवारी पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. मात्र बेंगळूरुचे आव्हान त्यापेक्षा तगडे आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रांतांमध्ये कोलकाताचा संघ हा सातत्य जपणारा आहे. याचप्रमाणे गुजरातविरुद्धच्या पराभवामुळे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघ अधिक त्वेषाने अवतरू शकेल.

कोहलीसोबत सलामीची जोडी जुळल्यानंतर गेलने ३८ चेंडूंत ७७ धावांचा तडाखा दिला. १७ सामन्यांनंतर साकारलेल्या या अर्धशतकी खेळीचे आणखी एक महत्त्व होते. ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरला. गेल आणि कोहलीने ७६ चेंडूंत १२२ धावा केल्या होत्या.

अतिरिक्त फलंदाजाला संधी मिळावी, म्हणून कोलकाताने कामचलाऊ यष्टीरक्षक रॉबिन उथप्पाला संधी दिली होती. मात्र रविवारच्या सामन्यात अपयशी सूर्यकुमार यादवच्या जागी सौराष्ट्रच्या शिल्डन जॅक्सनचा संघात समावेश होऊ शकेल. सुनील नरिन सलामीवीराची भूमिका चोख बजावत आहे.