कोरियन ओपन स्पर्धेत परुपल्ली कश्यप आणि साईप्रणीत यांना दुसऱ्या फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर महिलांमध्ये पी. व्ही. सिंधू आणि पुरुषांमध्ये समीर वर्मा यांनी भारताचं आव्हान कायम ठेवलं आहे. मात्र भारताच्या पुरुष दुहेरी जोडीने आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला. सत्विकसाईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या चीन तैपेईच्या ली ह्युई आणि ली यांग जोडीचा २३-२१, १६-२१, २१-८ असा फडशा पाडला. भारताची दुहेरी जोडी ही जागतिक क्रमवारीत सध्या ३९ व्या स्थानावर आहे. त्यामुळे या स्पर्धेत त्यांनी केलेली कामगिरी ही महत्वाची मानली जातेय.

कोरिया ओपन ही भारताच्या दोन्ही खेळाडूंसाठी पहिली आंतराष्ट्रीय स्पर्धा आहे. त्यामुळे आपल्या पहिल्याच फेरीत सत्विकसाईराज आणि चिरागने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. या दोन्ही खेळाडूंना पुढच्या फेरीत जपानच्या तकेशी कमुरा आणि केईगो सोनोडा यांच्याशी सामना करावा लागणार आहे. या दोन्ही खेळाडूंना हरवल्यास भारतीय जोडी कोरिया ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

अवश्य वाचा – सिंधू, समीर वर्माची आगेकूच, कश्यपचं आव्हान संपुष्टात