भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी मैदानात घाम गाळणाऱ्या सुरेश रैनानं फिरकीपटू कुलदीप यादवचं कौतुक केलंय. भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या कुलदीपला माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी घडवले, असे मत रैनाने व्यक्त केलं. गोवा रिव्हर मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगो अनावरण कार्यक्रमात रैना सहभागी झाला होता. यावेळी तो बोलत होता.

रैना म्हणाला की, कुलदीप यादवच्या गोलंदाजीतील जादूचे पूर्ण श्रेय हे कुंबळे यांचे आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आयपीएलच्या सामन्यादरम्यान मी अनेकदा कुलदीपशी चर्चा करायचो. त्यावेळी तो कुंबळेंना मेसेज करायचा, अशी आठवणही रैनाने यावेळी सांगितली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिकचा पराक्रम केल्यानंतर कुलदीप यादव चर्चेत आला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेड, अॅश्टन अगर आणि पॅट कमिन्सला बाद करत कुलदीपने हॅटट्रिक केली. कुलदीप यादव भारताकडून हॅटट्रिक करणारा तिसरा गोलंदाज ठरला होता.

रैना बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत असल्याचे त्याने सांगितले. दुखापतीचा काळ माझ्यासाठी फार कठीण होता, असेही तो म्हणाला. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या योयो टेस्टवरील प्रश्नावर त्याने मौन बाळगले. युवराज सिंग आणि सुरेश रैना योयो टेस्टमध्ये अपात्र ठरल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात चांगलीच रंगली होती. यावर रैनाला प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रैनाने हा प्रश्न बीसीसीआयला विचारा, असे सांगितले.