भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) अध्यक्ष एन.रामचंद्रन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हॉकी इंडिया पाठोपाठ भारतीय बोलिंग महासंघानेही (बीएफआय) रामचंद्रन यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
बीएफआयच्या अध्यक्षा सुनयना कुमारी व सरचिटणीस डी.आर.सैनी यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याची मागणी केली असून रामचंद्रन यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्याचा इशारा दिला आहे. बीआयएफने एका पत्रकात म्हटले आहे की, ‘‘रामचंद्रन यांच्या कारभारास आम्ही कंटाळलो आहोत. त्यांच्या कालावधीत संघटनेची अधोगती होत आहे. त्यामुळेच आम्ही घटनेच्या तरतुदीनुसार अविश्वास ठराव आणण्याचा विचार करीत आहोत.’’
हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी दोनच दिवसांपूर्वी रामचंद्रन यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत अध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. अविश्वासाचे ठरावास दोन तृतीयांश सदस्यांची मते आवश्यक असतात. प्रत्येक संलग्न संघटनेस राष्ट्रीय क्रीडा संघटनांची प्रत्येकी तीन मते असतात. रामचंद्रन हे कोणालाही विश्वासात न घेता एकटेच निर्णय घेतात, असाही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.