राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केली जाणारी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जयंती यंदा हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली आहे. जवळपास ३५ वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेत भारतीय महिलांनी पाचवे स्थान पटकावून ऑलिम्पिकच्या आशा कायम राखल्या होत्या आणि त्यावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. नेदरलॅण्ड आणि इंग्लंड यांनी युरो हॉकी अजिंक्यपद स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे महिलांचा रिओ ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा झाला. ‘‘भारतीय महिला संघामध्ये पदक जिंकण्याची धमक आहे आणि अधिक मेहनत घेतल्यास ते यंदा बाजीही मारू शकतात,’’ असे मत माजी हॉकीपटू पद्मश्री एलाएजा नेल्सन यांनी व्यक्त केले.
१९८० नंतर भारतीय महिला पहिल्यांदा ऑलिम्पिकवारीला जाणार असल्यामुळे नेल्सन यांनी आनंद व्यक्त केला आहे. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये नेल्सन यांनी भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्या म्हणाल्या, ‘‘या बातमीमुळे खूप आनंद झाला आहे. ३५ वर्षांची प्रतीक्षा संपली. ऑलिम्पिक स्पध्रेत भारतीय झेंडय़ाखाली खेळणे, ही अभिमानाची बाब आहे आणि या मुलींना ती संधी मिळाली आहे. त्यामुळे संधीचे सोने करण्यासाठी मुलींनी आत्तापासून सुरुवात करायला हवी.’’
ऐंशीच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदकाने हुलकावणी दिली होती. झिम्बाब्वेविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सुटल्यामुळे भारताला सहा देशांमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि त्याच झिम्बाब्वेने नंतर सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. ती सल मनाला बोचत असली तरी रिओ ऑलिम्पिकमध्ये नेल्सन यांनी चमत्काराची आशा आहे.
‘‘या भारतीय संघाला विविध स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांनी कामगिरीचा आलेख चढाच ठेवला आहे. त्यामुळे रिओत चमत्कार घडेल असे म्हणायला हरकत नाही,’’ असे मत नेल्सन यांनी व्यक्त केले. त्याच वेळी त्यांनी १९८२च्या आशियाई क्रीडा स्पध्रेची आठवण करून दिली.
त्या म्हणाल्या, ‘‘ऑलिम्पिक पदकाने हुलकावणी दिली असली तरी १९८२ मध्ये माझ्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी आशियाई सुवर्णपदक जिंकले होते आणि ती कामगिरी आजतागायत कुणालाही करता आलेली नाही.’’